कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील शिवाजीराव नाईक समर्थकांत अंतर्गत गट पडले आहेत. प्रत्येकाने स्वतंत्र गट तयार केल्याने गावात नेमका विरोधक कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे ग्रामस्थांत साशंकता निर्माण झाली आहे.कासेगावात विरोधी गट प्रबळ असला तरी, त्याला फुटीचे ग्रहण लागले आहे. गावात आज प्रामुख्याने विरोधात दोन गट आहेत. काँगे्रसची जवळीक असणारा अॅड. बी. डी. पाटील यांचा एक गट, तर ज्येष्ठ स्वा.सै. बापू शिंदे (सरकार) यांचा दुसरा गट. पूर्वी हे दोन्ही गट शिवाजीराव नाईक यांचे काम करीत होते. मात्र २00९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर या दोन्ही गटात तीव्र मतभेद झाल्याने बी. डी. पाटील गटाने त्यावेळी मानसिंगराव नाईक यांचे काम केले होते, तर शिंदे गटाने शिवाजीरावांना साथ दिली होती. तेंव्हापासून दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांचे पाय ओढण्याची एकही संधी सोडत नाहीत. नेताजी पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. मात्र त्यांचा मुक्काम गावात कमी आणि मुंबई, पुण्यातच जास्त असल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत गावातून राजू शेट्टी आणि शिवाजीराव नाईक यांना मताधिक्य मिळाले. हे मताधिक्य माझ्यामुळेच गेले आहे, असे म्हणून प्रत्येकजण स्वत:चीच पाठ थोपटून घेत आहे. शिवाजीराव नाईक गटातील प्रत्येक कार्यकर्त्याचा एक स्वतंत्र गट असल्याने ते प्रत्येकवेळी एकमेकांवर कुरघोड्या करीत आहेत. नाईक दौऱ्यावर येतात त्यावेळी हे सर्व गट स्वतंत्रपणे त्यांच्या मागे—पुढे करताना दिसतात. एकूणच या अनेक गटांमुळे गावातील नक्की विरोधक गट कोण? असा सवाल ग्रामस्थांना पडत आहे. (वार्ताहर)गावात अपुरा व अनियमित पाणी पुरवठा, अस्वच्छता, अंतर्गत खराब रस्ते, गटारी स्वच्छता आदी समस्या आहेत. विरोधकांत एकी नसल्याने हे प्रश्न जैसे थे आहेत. मध्यंतरी दारूबंदीबाबत विरोधक आक्रमक झाले होते. त्यानंतर ते शांतच आहेत. यामागे काय गौडबंगाल आहे? अशी चर्चा ग्रामस्थांत आहे.
कासेगावात शिवाजीराव नाईक कार्यकर्त्यांत गटाचे राजकारण
By admin | Published: January 14, 2015 10:25 PM