ढालगाव : मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकारणासाठी तुम्ही धर्माचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असाल, तसेच धर्माचा व्यक्तिगत लाभ घेण्याचा प्रयत्न करीत असाल तर सामान्य लोक अशा गोष्टी स्वीकारत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.
आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बनात बिरोबाच्या दर्शनासाठी रोहित पवार आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सामान्य लोकांना अशा गोष्टीत रस नसतो. त्यांना आज आपल्या मुलांना रोजगार देणारे शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, शहरी भागातील प्रश्न महत्त्वाचे आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत या सगळ्या गोष्टी सामान्य लाेकांसाठी जास्त महत्त्वाच्या आहेत. धर्माचा वापर तुम्ही व्यक्तिगत लाभासाठी करत असाल तर ते आपल्या संस्कृतीमध्ये स्वीकारले जात नाही.
जे लोक धर्माचा फायदा राजकारणासाठी करत आहेत, त्यांना लोक कधीही स्वीकारणार नाहीत. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आरेवाडीच्या बिरोबा मंदिर परिसराच्या विकासासाठी आर. आर. आबांनी भरीव निधी दिला. त्यातून एक चांगले पर्यटनस्थळ होत आहे. पुढच्या काळातही येथे भरीव निधी देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विकास हाक्के, माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर यांनी रोहित पवार यांचा फेटा, घोंगडी व काठी देऊन सत्कार केला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष राहुल कोळेकर, उपाध्यक्ष समाधान कोळेकर, सचिव बाळासाहेब कोळेकर, महाकाली कारखान्याचे संचालक शिवाजीराव कोळेकर, लंगरपेठचे सरपंच महेश पवार, भारत पाटील, भाऊसाहेब पाटील, संजय दाईंगडे, अनिल सूर्यवंशी, धर्मराज रूपनर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.