अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील नगरपालिकेतील सत्ताधारी विकास आघाडीने साडेचार वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सुशोभिकरण, भुयारी गटारींना मंजुरी आणि काही रस्ते याव्यतिरिक्त काहीही विकास केला नाही. यावर विरोधी राष्ट्रवादी आतापर्यंत मूग गिळून गप्प होती. परंतु आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांनी निधीच्या घोषणांचा पाऊस पाडला आहे. परंतु शहरातील विकास कामांवर त्यांची चुप्पी आहे.
पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील मागील सत्ताधाऱ्यांना पायउतार केल्यानंतर सत्ताधारी विकास आघाडीने शहराच्या विकासाचे गाजर दाखविले. प्रत्यक्षात मात्र भुयारी गटारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरण याव्यतिरिक्त कोणताही विकास समोर आला नाही. सत्ताधारी विकास आघाडीतील नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोट्यवधीचा निधी दिल्याचा दावा विकास आघाडीचे पक्षप्रतोद विक्रम पाटील यांनी अनेकवेळा केला आहे. परंतु त्यांनी स्वत:चा प्रभाग वगळता इतर विभागांकडे लक्षही दिलेले नाही. कामांच्या उद्घाटनावरूनही सत्ताधाऱ्यांमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे.
विकास कामांबाबत विरोधी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशी भूमिका घेतली. त्यामुळे शहराच्या विकासाला गती मिळाली नाही. दरम्यान, राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यानंतर पालिकेतील विरोधी राष्ट्रवादीतही अंतर्गत संघर्ष असल्याने गटनेते संजय कोरे यांनी कामकाजात लक्ष घातले नाही. परिणामी स्वयंभू नेतृत्वाचे राजकारण सुरू झाले. याचा फायदा सत्ताधारी विकास आघाडीने उठविला आहे. जयंत पाटील यांनी आणलेल्या निधीचे श्रेय मिळण्यासाठी त्याबाबतची घोषणा आरोग्य सभापती विश्वनाथ डांगे यांनी केली. परंतु सत्ताधारी विकास आघाडीचे गटनेते विक्रम पाटील यांनी विरोधकांच्या घोषणा हाणून पाडल्या. तो निधी फडणवीस यांनीच मंजूर केल्याचे सांगितले. या दोन्ही गटात घोषणांचे राजकारण सुरू झाले आहे. परंतु शहरातील विकासाचे चित्र मात्र जैसे थे आहे.