निवडणुकांची तयारी; राजकीय यात्रांमुळे राजकारण ढवळले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 05:43 PM2023-09-13T17:43:04+5:302023-09-13T17:51:01+5:30
जयंत पाटीलांच्या भूमिकेमुळे संभ्रमावस्था कायम
सांगली : काँग्रेसची जनसंवाद यात्रा, भाजप नेत्या पंकजा मुंडेंची शिवशक्ती परिक्रमा आणि आता शिवसेनेने सुरू केलेले ‘हाेऊ द्या चर्चा’ मोहिमेने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीतील शरद पवारांचा गट व शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट अद्याप शांत आहे. निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या मोहिमा आखत मैदानावरील स्थितीचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे.
सांगली जिल्ह्यातील राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसह त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या मोहिमा हाती घेतल्या आहेत. सर्वच पक्षांच्या राजकीय यात्रा व अभियानांमध्ये राज्य व देशपातळीवरील विषयांवर चर्चा झडत आहेत. स्थानिक प्रश्नांचा ऊहापोह होताना दिसत नाही. तरीही या माध्यमातून जिल्ह्यातील मतदारांवर आपापल्या भूमिका बिंबविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन अभियान सुरू करण्यात आले आहे. काँग्रेसचे सर्व नेते जनसंवाद यात्रेसाठी एकवटले आहेत. दुसरीकडे भाजपमध्ये गटबाजीमुळे विस्कळीतपणा दिसून येत आहे. पंकजा मुंडेंच्या यात्रेतही जिल्ह्यातील नेत्यांमधील मतभेद उजेडात आले. तरीही एकापाठोपाठ एक राजकीय अभियान सुरू झाले आहेत.
जयंतरावांच्या भूमिकेमुळे संभ्रमावस्था कायम
फूट पडल्याने सध्या हादरलेल्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात शांतता आहे. त्यांच्याकडून कोणताही राजकीय कार्यक्रम हाती घेण्यात आलेला नाही. जयंत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असली तरी त्यांच्याच भूमिकेबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षाकडे सध्या अभियान नाही.
आम्ही लवकरच ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविणार आहोत. सध्या जिल्हाभर आमच्या बैठका सुरू आहेत. शिवदूत नेमून त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. पक्षातील पदाधिकारी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. - आनंदराव पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना, शिंदे गट
सध्या कोणताही राजकीय कार्यक्रम आखलेला नाही. पण, पक्षामार्फत भविष्यात जनतेशी संवादाचे अभियान राबविण्यात येईल. जिल्ह्यात पक्षाची ताकद अबाधित आहे. - अविनाश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी, शरद पवार गट