कडेगाव तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, मतदान केंद्रावर मतदान यंत्रे पोहच करण्यात आली आहेत. आज शुक्रवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे.
दरम्यान, मतदान केंद्रांवर कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथक देखील तैनात करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी दिली.
तालुक्यातील शिरसगाव, सोनकिरे, अंबक, रामापूर, शिवणी, येतगाव, ढाणेवाडी, कान्हारवाडी, कोतिज या नऊ गावांमध्ये ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. एकूण नऊ गावांतील ७९ जागांपैकी पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता ७४ जागांसाठी १७२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यात प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये सामना होत आहे.
दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी थंडावल्या आहेत. प्रत्येक उमेदवाराने मतदारांचे घर टू घर पिंजून काढले आहे.
तालुक्यात होत असलेल्या नऊ ग्रामपंचायती निवडणुकीसाठी ३५ मतदान केंद्रांवर एकूण १९६२३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ९७०१ महिला तर ९९२१ पुरुष मतदारांचा समावेश आहे. दरम्यान, मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सर्व मतदान केंद्रांवर बसच्या साहाय्याने मतदान यंत्रे पोहच करण्यात आली आहेत. दरम्यान, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.