सांगली : राजकीय पक्षांच्या बैठका, सभांनी वातावरण ढवळून निघालेल्या सांगली महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणुक सोमवारी राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केली. एकूण २० प्रभागातील ७८ नगरसेवकांसाठी येत्या १ आॅगस्टरोजी मतदान होणार आहे. तर ३ आॅगस्ट रोजी मतमोजणी होईल. आयोगाने आजपासूनच आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही दिले आहेत.सांगली महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत १३ आॅगस्ट रोजी संपत असून तत्पूर्वी नवीन सभागृह अस्तित्वात येणे आवश्यक आहे. जून महिना उजाडल्यापासूनच शहरवासियांसह इच्छुक उमेदवार, राजकीय पक्षांना निवडणुकीची उत्सुकता लागली होती.
गेल्या पंधरा दिवसापासून तर कधी निवडणुकीची तारीख जाहीर होणार, याचीच अधिक चर्चा रंगली होती. त्यातच निवडणुका सहा महिने पुढे जाणार असल्याच्या अफवेने इच्छुकांचे धाबे दणाणले होते. अखेर राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.त्यानुसार आता १ आॅगस्टला मतदान होणार असून ३ आॅगस्टला मतमोजणी होईल. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ४ जुलैपासून सुरू होणार आहे. सोमवारी सकाळी आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची वाहने, मोबाईल व इतर सुविधा काढून घेण्याचे आदेश आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी दिले आहेत.निवडणुक कार्यक्रम असा
- नामनिर्देशन व स्वीकारणे : ४ ते ११ जुलै
- नामनिर्देशन पत्राची छाननी : १२ जुलै
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : १७ जुलै
- निवडणुक चिन्हांचे वाटप : १८ जुलै
- मतदानाचा दिनांक : १ आॅगस्ट
- मतमोजणी : ३ आॅगस्ट