सांगली : जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ या तीन नगरपंचायतींच्या प्रत्येकी १३ म्हणजे एकूण ३९ जागांसाठी मंगळवारी २१ डिसेंबरला मतदान होत आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यासह राज्याचे नेतृत्व करणाऱ्या दिग्ग्ज नेत्यांनी ताकद पणाला लावल्याने या निवडणुका लक्षवेधी ठरल्या आहेत. १९ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
तिन्ही नगरपंचायतीच्या प्रत्येकी एकूण १७ जागा असल्या तरी ओबीसीच्या आरक्षणप्रश्नी न्यायालयात प्रलंबित वादामुळे सध्या तिन्ही शहरांत १३ जागांसाठी मतदान होणार असून, उर्वरित प्रत्येकी चार जागांसाठी १८ जानेवारीला मतदान होणार आहे. या जागाही आता खुल्या गटातून लढविल्या जाणार आहेत. नगरपंचायतींची यंदाची निवडणूक दिग्ग्ज नेत्यांच्या सहभागामुळे गाजली आहे.
कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधात सर्वपक्षीय आघाडी असा सामना रंगला आहे. येथील १३ जागांसाठी ४४ जण रिंगणात आहेत. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी राष्ट्रवादीतर्फे स्वतंत्र पॅनेल तर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्या अनिता सगरे व गजानन कोठावळे यांनी भाजप, काँग्रेस, शिवसेनेला सोबत घेत शेतकरी विकास आघाडी मैदानात उतरवली आहे. ही निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे.
कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत १३ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात असून, येथे काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप असा तिरंगी सामना रंगला आहे. कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी प्रचारात जोर लावला होता. राष्ट्रवादीतर्फे पालकमंत्री जयंत पाटील तर भाजपच्यावतीने माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख यांनी ताकद पणाला लावली आहे. खानापूर नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. तेथे शिवसेना व काँग्रेसच्या एका गटाची आघाडी, भाजप-राष्ट्रवादीचा एक गट व काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होत आहे. जिल्ह्यातील या तिन्ही नगरपंचायतीसाठी सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे.
उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार
तिन्ही नगरपंचायतींच्या एकूण १२५ उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रात बंद होणार आहे. निकालासाठी त्यांना महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे तिन्ही ठिकाणच्या पक्षीय कार्यकर्ते, उमेदवार व नागरिकांची उत्सुकता ताणली जाणार आहे.