सांगली : मूर्तीदान, निर्माल्यदान, कुंडातील विसर्जनाची चळवळ सांगली शहरात जोमाने कार्यरत झाली आहे. याकामी अनेक संघटना एकवटल्या असून, पर्यावरणपूरक उत्सवासाठी जनजागृतीतून जनसहभागाची अपेक्षा आहे.नागरिक जागृती मंच, आभाळमाया फाऊंडेशनने याकामी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून डॉल्फिन ग्रुप व अन्य काही संघटना मूर्तीदान, निर्माल्यदान चळवळ राबवित आहेत. या संघटनांना आता आणखी संघटनांचे बळ मिळाले असून, यावर्षी मोठ्या जनजागृतीचे काम हाती घेण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक उत्सवाला साथ देत जिल्ह्यात आता हजारो कुटुंबांमार्फत शाडू मूर्तींची प्रतिष्ठापना करून त्याचे घरी, विहिरीत व नदीत विसर्जन केले जाते. शाडूच्या मूर्तीला वाढत जाणारी मागणीसुद्धा जनजागृतीचा परिणाम आहे. गेल्या दोन वर्षात सांगली, मिरजेत मूर्तीदान चळवळीलाही मोठे यश मिळाले आहे. शेकडो कुटुंबांनी मूर्तीदान करून पर्यावरणपूरक उत्सवाला साथ दिली.यंदा नागरिक जागृती मंच, आभाळमाया फाऊंडेशन व अन्य काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. नदीतील विसर्जनाचे प्रमाण घटवून कुंडात विसर्जन करण्यासाठी व्यापक चळवळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील ज्या शहरांनी याबाबत ठोस पावले उचलली आहेत, तेथील अभ्यास करून त्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. ज्यांना पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जन करायचे आहे, त्यांच्यासाठी सांगली, मिरज, कुपवाड शहरात पाच ठिकाणी विसर्जन कुंड उभारले आहेत. महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळानेही याकामी पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.