मिरज : मिरजेतील शिवाजी चौक परिसरातील भंगार गोदामाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या तीन वाहनांनी आग आटोक्यात आणली. भरवस्तीत लागलेल्या आगीच्या घटनेमुळे नागरिकांची धावपळ उडाली.
मिरजेतील शिवाजी चौक, माळी गल्ली परिसरात नितीन धुमाळ यांच्या भंगार साहित्याच्या गोदामाला शुक्रवारी दुपारी १२ वाजता अचानक आग लागली. आगीत गोदामातील संपूर्ण भंगार साहित्य जळून खाक झाले. महापालिका अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीत धुमाळ यांचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. गोदामाशेजारी अनेक दुकाने होती, मात्र आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. नागरी वस्तीत अचानक लागलेल्या आगीमुळे नागरिकांची धावपळ उडाली. यावेळी नगरसेवक शिवाजी दुर्वे, निरंजन आवटी, संदीप आवटी, बाबासाहेब आळतेकर यांनी धाव घेत परिसरातील सिलिंडर बाजूला करत नागरिकांना मदत केली.
आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीची माहिती समजताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. प्लास्टिक व सर्व भंगार साहित्याला आग लागल्याने धुराचे लोट पसरले होते.