ढालगाव : डाळिंब शेती ही निश्चितपणे शेतकऱ्यांना तारणारी आहे. मात्र त्यासाठी योग्य नियोजन व त्याची काटेकाेर अंंमलबजावणी केली पाहिजे. अन्यथा आपण आपला बहुमूल्य वेळ व श्रम वाया घालवतोय, असा त्याचा अर्थ होईल, असे प्रतिपादन डाळिंब तज्ज्ञ बी. टी. गोरे यांनी केले.
ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर डाळिंब फळ पिकावरील कीड, रोग व सल्ला प्रकल्पांतर्गत चौथ्या शेती शाळेचे आयोजन उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या शेती शाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून डाळिंब तज्ज्ञ बी. टी. गोरे उपस्थित होते. त्यांनी डाळिंब पिकावरील एकात्मिक कीड, पाणी, तण व बहर व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
शेती शाळेस ढालगावच्या सरपंच मनीषा देसाई, महांंकाली कारखान्याचे संचालक संजय पाटील, ढालगाव सर्व सेवा सोसायटीचे अध्यक्ष मधुकर देसाई, ग्रामपंचायत सदस्य, तालुका कृषी अधिकारी एम. जे. तोडकर, मंडल कृषी अधिकारी, बी. एस. धडस, कृषी पर्यवेक्षक डी. यू. चोरमुले व ए. पी. राठोड, कृषी सहायक. बी. एस. शिंदे, आर. एन. बजबळे, एम. एम. खांडेकर, ए. एम. धाईंजे, एस. आर. घुले, एस. बी. शिंदे, जी. एस. सरक यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.