जत : जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करीत शेत तलाव व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डाळिंबाच्या बागा उभ्या केल्या आहेत. डाळिंबाचे सौदे गेल्या महिन्यापासून बंद असल्यामुळे सात कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांंना आर्थिक फटका बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सौद्याला परवानगी देऊनही सौदे बंद असल्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र १२ हजार २२१ एकर आहे. चागंला भाव मिळत असल्यामुळे केशर (भगवा) जातीच्या बागा अधिक आहेत. उमदी, दरीबडची, काशिलिंगवाडी, शेगाव, वाळेखिंडी, बेवणूर, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी, संख, निगडी बुद्रुक या परिसरात डाळिंब फळबागा आहेत. गेल्यावर्षी संख, दरीबडची, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी येथे टँकरने पाणी देऊन बागा वाचविल्या आहेत. सध्या डाळिंब बागा काढणीस आल्या आहेत. कोरोनाचा संसर्गाचा फटका डाळिंब उत्पादकांना बसला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंबाचे सौदे सध्या बंद आहेत. जत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाचे सौदे महिन्याभरापासून बंद आहेत. व्यापारी बागेतील काही फळे घेत नाहीत. अशी फळे शेतकरी तोडून घेऊन येत होता. याच शेतकऱ्याला फायदा झाला होता. सौद्याला दोन हजार क्रेट म्हणजे पन्नास टन डाळिंबाची आवक होते. भाव ३५ ते ८० रुपयेपर्यंत मिळत होता. डाळिंबाची ४० लाखांची उलाढाल होती. कामगारांना रोजगार मिळत होता. सध्या हे डाळिंबाचे सौदे महिनाभरापासून बंद असल्याने सात कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी लाॅकडाऊन शिथिल केले आहे. फळ मार्केटला सवलती देऊनही जतमध्ये सौदे मंगळवारी बंदच होते.
चौकट
बाजारपेठा बंद
सध्या लॉकडाऊनमुळे बेंगलोर, चन्नई, कोलकाता, दिल्ली, कानपूर, विजयवाडा येथील मार्केट बंद आहेत. गतवेळीही कोरोनामुळे कवडीमोल दराने डाळिंब विकण्याची वेळ आली होती. यावर्षी तरी चांगला दर मिळेल या आशेपोटी शेतकरी तग धरून आहे.
कोट
डाळिंब सौदे बंद असल्याने पिकलेल्या मालाची अडचण झाली आहे. माल लवकर विकला नाही तर नुकसान होणार आहे. सौदे कोरोना नियम पाळून सुरू करावेत.
आप्पासाहेब चिकाटी, शेतकरी.
कोट
व्यापाऱ्यांकडून सौदे कधी सुरू होणार याबाबत विचारणा होत आहे. सौद्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून पत्र आलेले नाही. आदेश आले तर लवकरच सौदे सुरू होणार आहेत.
-एस. बी. चौधरी, सचिव, बाजार समिती, जत.