आटपाडी : बोंबेवाडी (ता. आटपाडी) येथील शेतकरी यशवंत मेटकरी यांच्या शेतातील ५०० डाळिंब झाडावरील सुमारे चार लाख रुपयांच्या डाळिंबाची चोरीची घटना घडली आहे. याबाबत आटपाडी पोलिसांत अज्ञाताविरोधात तक्रार देण्यात आली आहे.यशवंत मेटकरी यांच्या बागेतील तीन टन डाळिंब अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी पळवली आहेत. यशवंत मेटकरी यांच्या बोंबेवाडी येथील शेतामध्ये चार हजार डाळिंबाची झाडे आहेत. उत्तम दर्जाची डाळींब तयार आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी मेटकरी यांच्या डाळिंब बागेत भेट देत विक्रीसाठी बोली लावली होती. एका व्यापाऱ्याने १४८ रुपये प्रति किलोने ठरविली होती. त्या डाळिंबाची विक्री होणार होती. मात्र, शुक्रवारी रात्रीच्या वेळी चोरट्यांनी ५०० झाडावरील डाळिंब रातोरात लंपास केली. यातून अंदाजे चार लाखांचे नुकसान झाले आहे.कष्टाने पिकवलेली डाळिंब चोरीला गेल्याने मेटकरी यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी अनेक कष्ट करून डाळिंब शेती पिकवली आहे. मात्र, सध्या डाळिंब बागेतील होत असणारी वाढती चोरी यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत सामुदायिक प्रयत्नातून आपल्या डाळिंब बागेचे संरक्षण करणे गरजेचे आहे.
सांगली: संकटावर मात करून शेती पिकवली, अज्ञातांनी चार लाखांची डाळिंब चोरली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 1:00 PM