लोकमत न्यूज नेटवर्क
कवठे एकंद : कुमठे (ता. तासगाव) येथून नांद्रेला जाणारा कुमठे - नांद्रे जुना रस्त्याची दुरवस्था झाली आहे. कुमठे गावातून सांगली-तासगाव रस्त्याला जोड मार्ग असणारा हा रस्ता दुर्लक्षित राहिला आहे. या भागात पावसाळ्याच्या दिवसात अतिशय बिकट परिस्थिती असते. यामुळे कुमठे-नांद्रे जुना रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.
जड वाहतुकीमुळे रस्त्याला खाच-खळगे पडल्याने दुचाकीधारकांना येथून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच या रस्त्यावर शेतकऱ्यांचीही ये-जा सुरू असल्याने त्यांनी खड्ड्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
जुना नांद्रे रस्ता व परिसरातील वस्ती भागात दिवाबत्तीची सोय करण्याचे काम सुरू आहे. ते तातडीने पूर्ण करावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. कुमठे गावापासून पश्चिमेकडे जाणारा रस्ता जुना नांद्रे रस्ता म्हणून ओळखला जातो.
परिसरातील शेतकऱ्यांना व वस्तीवरील नागरिकांना ये-जा करण्यासाठी सोयीचा तसेच तासगाव-सांगली मार्गाला जोडणारा जवळचा रस्ता आहे. सुमारे चार किलोमीटर असणारा रस्त्याला काही भागात डांबरीकरण व मुरमीकरण आहे. परंतु रस्त्याची डागडुजी केले नसल्याने रस्ता दुर्लक्षित आहे. रस्त्याचे डांबरीकरण केल्यास हा रस्ता होणार आहे. पूर्ण रस्ता डांबरीकरण केला जावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी, नागरिकांतून होत आहे.
फोट-१२कवठे एकंद१