इस्लामपूर : सततचा पाऊस आणि महापुराचा फटका बसल्यानंतर अद्याप सुरु असलेल्या अवकाळीच्या दणक्याने रस्त्यांची दयनीय अवस्था बनली आहे. ग्रामीण भागासह शहरातील रस्तेही पूर्णपणे उखडले आहेत. या रस्त्यांवर खड्ड्यांची मालिकाच तयार झाली आहे. अशावेळी या रस्त्यांची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे. परंतु तसे न करता खड्डे मुजविण्याच्या नावाखाली केवळ निकृष्ट दर्जाचे पॅचवर्क करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते ताकारी हा राज्यमार्ग असून, बुधवारी सकाळपासून या रस्त्यावरील खड्डे मुजविण्याचे काम रस्ते विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत सुरु करण्यात आले आहे. हे पॅचवर्क करणाऱ्या ठेकेदाराकडून वापरल्या जात असलेल्या निकृष्ट दर्जाच्या डांबरावरुन शिवसेनेचे कार्यकर्ते घन:श्याम जाधव यांनी आक्षेप घेतला.
हे डांबर नसून आॅईलमिश्रित मिश्रण असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र तरीही हेच डांबरसदृश मिश्रण टाकून त्यावर हॉटमिक्स पध्दतीने तयार केलेली खडी पसरुन रोलिंग केले जात होते. रस्त्यावरील खड्ड्यांची पुरेशी स्वच्छता न करता हे पॅचवर्कचे काम सुरु होते. या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल रस्त्यावरुन ये—जा करणारे नागरिकही नापसंती व्यक्त करत होते.