सांगली : सव्वा वर्षापासूनच्या लॉकडाऊनमुळे लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या फेरविचाराची मागणी पुढे येत आहे. ज्या गावात किंवा तालुक्यात रुग्णसंख्या जास्त असेल, तेथेच लॉकडाऊन सुरू ठेवावा, असा सूर उमटत आहे.
कमी रुग्णसंख्येच्या गावांत व तालुक्यांत व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगीची मागणी होत आहे. कोरोनामुक्त गावेही सरसकट लॉकडाऊनमुळे भरडली जात आहेत. पहिल्या लाटेत शहरी भागात कोरोनाचा जोर असताना ग्रामीण भागही वेठीस धरला गेला. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोरोना फोफावताना शहरी भागाची नाहक होरपळ सुरू आहे.
यामुळे लॉकडाऊनच्या फेरविचाराची मागणी विविध स्तरांतून होत आहे. जास्त रुग्णसंख्येच्या गावांत लॉकडाऊन ठेवून शेजारच्यांना सूट द्यावी, हाच निकष तालुक्यांनाही लावावा. कमी रुग्णसंख्येच्या तालुक्यांत लॉकडाऊन शिथिल करावा, सीमांची नाकाबंदी करावी, अशी मागणी होत आहे.
चौकट
शिराळा, कडेगाव, पलूसमध्ये रुग्ण कमी, तरीही टाळेबंदीचे जोखड
दुसऱ्या लाटेत आटपाडी, शिराळा, कडेगाव, पलूस तालुक्यांत दररोजची रुग्णसंख्या तुलनेने कमी आहे. खुद्द पलूस, शिराळा, कडेगाव, कवठेमहांकाळ या शहरांतही दररोजची रुग्णसंख्या ५० पेक्षा कमी आहे. तरीही ते वेठीस धरले जात आहेत. तेथील सक्रिय रुग्णांना कडक विलगीकरणात ठेवून उर्वरित जनजीवन मोकळे करता येईल.
चौकट
असे करता येईल
- महापालिका क्षेत्रात घाऊक व किरकोळ व्यापार वेगवेगळ्या वेळेत
- जिल्हाभरातून येणाऱ्यांना प्रवेशबंदी, जीवनावश्यक असल्यास परवानगी
- गावस्तरावरील कोरोनाग्रस्तांचे १०० टक्के विलगीकरण, उर्वरित व्यवहारांना मुभा
- कमी कोरोनासंख्येची गावे सील करून इतरांना प्रवेशबंदी, गावांतर्गत व्यवहार सुरू
- तालुकास्तरावरही कमी रुग्णसंख्या असल्यास नाकेबंदी, तालुक्यांतर्गत व्यवहारांना मुभा
चौकट
तुम्ही जबाबदारी घेणार का?
एका बैठकीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लॉकडाऊनसाठी असा फॉर्म्युला मांडला असता, लोकप्रतिनिधींनी त्याला विरोध केल्याचे समजते. यातून परिस्थिती चिघळल्यास तुम्ही जबाबदारी घेणार का, असा सवाल विचारण्यात आला, तेव्हा अधिकाऱ्याने शांत राहणे पसंत केले.
कोट
यापुढे लॉकडाऊन सहन करण्याची शक्ती उरलेली नाही. व्यापारी स्वत:हून दुकाने उघडण्याच्या मन:स्थितीत आहेत. रुग्णसंख्या कमी असणारी गावे, शहरे सील करून अंतर्गत व्यवहारांना परवानगीची मागणी आम्ही वारंवार केली आहे. महापालिका क्षेत्रातही अंतर्गत व्यवहार सुरू ठेवता येतील. ग्रामीण भागाच्या तुलनेने महापालिका क्षेत्रात फैलाव कमी आहे, त्यामुळे सांगली-मिरजेला वेठीस धरले जाऊ नये.
- समीर शहा, अध्यक्ष, व्यापारी संघटना
लॉकडाऊनमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कमी रुग्ण असणारी गावे लॉकडाऊनमधून वगळावीत. तेथील सक्रिय रुग्णांसाठी दक्षता समित्या, पोलीस व आरोग्य यंत्रणेने काटेकोर नियोजन करावे. इतर व्यवहारांना परवानगी द्यावी. दोन-तीन टक्के रुग्णांसाठी शंभर टक्के गाव कोंडून ठेवणे व्यवहार्य नाही.
- महादेव कोरे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना
अनेक छोट्या गावांत कोरोनाचे रुग्ण नाममात्र आहेत. तेथील लॉकडाऊन शिथिल करावा. मोठ्या गावांतही रुग्णांचे कडक विलगीकरण करून इतर व्यवहारांना मुभा द्यावी. आणखी तग धरण्याची शक्ती शेतकरी व सर्वसामान्यांत राहिलेली नाही.
- तानाजी पाटील, सरपंच सलगरे