मिरज : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गेले वर्षभर मोजक्याच रेल्वेगाड्या सुरू असल्याने मिरज रेल्वेस्थानकातील हमाल बेरोजगार झाले आहेत. कामाच्या प्रतीक्षेत दिवसभर स्थानकात बसून असलेल्या हमालांसमोर उदरनिर्वाहाची समस्या आहे.
मिरज जंक्शन स्थानकातून दररोज ६५ पॅसेंजर व एक्स्प्रेस रेल्वेगाड्या ये-जा करतात. मिरजेतून देशातील मोठ्या शहरात जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांची व प्रवाशांची संख्या मोठी असल्याने स्थानकात सुमारे दोनशे हमाल वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतात. लाॅकडाऊनपूर्वी हमालांना प्रवाशांचे सामान वाहून नेण्याचे काम मिळत होते. गतवर्षी २३ मार्चपासून लाॅकडाऊन सुरू झाल्यानंतर चार महिने सर्वच रेल्वेगाड्या बंद झाल्या. त्यानंतर मोजक्याच एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. यावर्षी मार्च एप्रिलपासून पॅसेंजरसह सर्व रेल्वे सुरू होण्याची प्रतीक्षा असतानाच मार्चपासून पुन्हा कोविड रुग्णांची संख्या वाढू लागल्याने अनेक गाड्या रद्द होऊन दिवसातून दोन ते तीन गाड्याच धावत आहेत. एक्स्प्रेस गाड्यातील प्रवाशांचीही संख्याही मोजकीच आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांचे साहित्य डोक्यावरून वाहून नेणाऱ्या हमालांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. रोजगाराअभावी हमाल हवालदिल आहेत. लाॅकडाऊनमुळे दुसरा उद्योग करण्याचीही अडचण असल्याने रेल्वेने आर्थिक मदत देण्याची हमालांची मागणी आहे. मिरज, सांगली व कोल्हापूर या मोठ्या स्थानकातच हमालांना प्रवाशांचे साहित्य वाहून नेण्याचे काम मिळते. मात्र गेले वर्षभर रोजगार नसल्याने हमालांची कमाई बंद आहे. मिरज रेल्वेस्थानकात दररोज हजारो प्रवाशांची गर्दी असते. मात्र कोरोना साथीदरम्यान गेल्या वर्षभरात स्थानकात शुकशुकाट आहे.
चाैकट
अन्य व्यावसायिकांनाही फटका
रेल्वेगाड्या बंद असल्याने नेहमीच वर्दळीचे ठिकाण असलेल्या मिरज रेल्वेस्थानक परिसरातील सर्वच व्यावसायिकांना फटका बसला आहेत. स्थानकातील फेरीवाले, विविध व्यावसायिक, स्टाॅलधारकांचा व्यवसाय बंद आहे. स्थानकाबाहेरील दुकानदार रिक्षावाले, पार्किंग ठेकेदार रेल्वे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.