पदे मिळतील, कामेही होतील, विचार करा; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना अजित पवार गटाची ऑफर

By अविनाश कोळी | Published: July 5, 2023 07:11 PM2023-07-05T19:11:08+5:302023-07-05T19:11:24+5:30

माजी आमदार, माजी नगरसेवकांनाही अशा ऑफर देण्यात आल्या आहेत.

Positions will be obtained, work will also be done, think Ajit Pawar faction offer to office bearers of NCP | पदे मिळतील, कामेही होतील, विचार करा; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना अजित पवार गटाची ऑफर

पदे मिळतील, कामेही होतील, विचार करा; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना अजित पवार गटाची ऑफर

googlenewsNext

सांगली : ‘आपल्याकडे संख्याबळ अधिक आहे. चांगली पदे तुम्हाला मिळतील व सत्तेत असल्यामुळे कामेही होतील. त्यामुळे विचार करा आणि कळवा’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी व काँग्रेसमधील नाराजांना ऑफर दिली जात आहे. माजी आमदार, माजी नगरसेवकांनाही अशा ऑफर देण्यात आल्या आहेत.

सांगली जिल्ह्यात अजित पवार गटाचे अस्तित्व अद्याप निर्माण झालेले नाही. मिरजेतील माजी महापौर इद्रिस नायकवडी वगळता उघडपणे कोणीही अजित पवारांच्या गटात दाखल झालेले नाही. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीतील नाराज नेत्यांची यादी तयार करुन त्यांना दूरध्वनीवरुन ऑफर दिली जात आहे. काही नेत्यांना थेट अजित पवार, सुनील तटकरे यांनी तर काहींना त्यांच्या निकटवर्तीयांनी फोन केले. माजी आमदार व माजी नगरसेवकांनाही पक्षात समावून घेण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. पक्षाचा अधिकृत ताबा घेण्यासाठी कायदेशीर लढाई सुरु होणार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच अजित पवार यांच्या गटाकडून यासाठी घाई केली जात आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अनेक पदाधिकारी उघडपणे त्यांच्याकडे गेले असले तरी सांगली जिल्ह्यात तसे चित्र अद्याप दिसलेले नाही. त्यामुळे सांगली जिल्ह्यात अनेकांना पदांची ऑफर देऊन पक्षात प्रवेशाकरीता आग्रह धरला जात आहे.

पक्षाचे सभासदही करावे लागणार
केवळ पदाधिकारी नियुक्त करुन अजित पवार यांच्या गटाचे काम संपणार नाही. त्यांना लगेच जिल्ह्यात सभासद दाखवावे लागणार आहेत. त्यामुळे फार लांबचा पल्ला त्यांना गाठायचा आहे. यासाठी ताकदीचे व कार्यकर्त्यांचे संख्याबळ मागे असलेल्या नेत्यांना खेचण्यासाठी ताकद लावली जात आहे.
चौकट

इद्रिस नायकवडी यांच्यावर जबाबदारी
जिल्ह्यातील नाराज नेते व पक्षात येऊ इच्छिणाऱ्या लोकांची नावे सुचविण्याचे व पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने माहिती देण्याची जबाबदारी इद्रिस नायकवडी यांच्याकडे देण्यात आल्याचे समजते. मुंबईतील बैठकीनंतरही अजित पवार यांच्या गटाकडून सांगली जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. येत्या आठवडाभरात यासाठी हालचाली वाढणार आहेत. 
 

Web Title: Positions will be obtained, work will also be done, think Ajit Pawar faction offer to office bearers of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.