सांगली : कोरोना झालाय म्हणून घाबरु नका, शासन आपल्या पाठीशी असून आपल्यावर योग्य उपचार केले जातील, असे सांगून संस्थात्मक विलगीकरणात आपल्याला चांगल्या सुविधा मिळतात का ? तुम्हाला चांगले जेवण मिळते का ? अशी विचारणा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली.
यावेळी त्यांनी स्थानिक प्रशासन आपली योग्य काळजी घेतय, त्यासाठी आपण सकारात्मक प्रतिसाद दिल्यास यातुन नक्की बरे व्हाल असा विश्वास शिराळा तालुक्यातील सागाव व मांगले येथे संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधीत रुग्णांना दिलासा दिला.शिराळा तालुक्यात सर्वाधिक कोरोनाबाधीत असलेल्या सागाव व मांगले या गावांना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट दिली. यावेळी तहसिलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पाटील, सागावचे सरपंच वसंत पाटील, उपसरपंच सत्यजीत पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. बी. निर्मळे, डॉ. पी. एम. चिवटे, मांगलेच्या सरपंच मिनाताई बेंद्रे उपस्थितीत होते.कोरोनाला रोखण्यासाठी कोरोनाचे निदान होणे हे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे. टेस्टिंगचे प्रमाण वाढविल्याने बाधितांची संख्या वाढेल पण घाबरुन न जाता आपल्याला किमान किती रुग्ण आहेत. हे निदर्शनास येईल. त्यानूसार उपचार पध्दती आपल्याला सुरु करता येतील आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, ग्राम दक्षता समित्यांनी तसेच गावाचे सरपंच, उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी प्रसंगी कठोर भुमिका घेणे आवश्यक आहे.
थोडेसे वाईटपण आपल्या गावासाठी फायदेशिर असल्याने कोरोना प्रतिबंधात्मक आदेश अधिक कडकपणे अंमलबजावणी करणे फायदेशिर आहे.
कोरोना रोखण्यासाठी कोरोनाबाबतचे प्रबोधन होणे आवश्यक असून नागरिकांनी स्वत:हून टेस्टिंगसाठी पुढे येणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जास्त रुग्ण असलेल्या गावातील स्थानिक प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरणाची कार्यवाही राबविणे गरजेचे आहे. तसेच स्वस्त धान्य दुकानावरील धान्य वाटप घरोघरी पोहचविण्याची व्यवस्था करावी.
स्थानिक आरोग्य विभागाला ऑक्सिमिटर, थर्मलगन व कोरोना प्रतिबंधात्मक उपकरणांची आवश्यकता अथवा मागणी तातडीने प्रशासनाकडे करणे गरजेचे आहे. त्याबरोबर ग्रामीणस्तरावरील खासगी डॉक्टरांनी त्यांच्याकडे उपचार घेत असलेल्या किंवा त्यांच्या निदर्शनास आलेल्या कोरोना बाधीत रुग्णांची माहिती संबधित यंत्रणांना तातडीने देणे बंधनकारक राहील.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सागाव व मांगले येथे सुरु करण्यात आलेले संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये अतिशय सुंदर व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांना आयसोलेट करणे आवश्यक होते अशा रुग्णांना येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांची उत्तम काळजी घेतली जात आहे.
आरोग्य विभागाचे कर्मचारी वेळोवेळी येऊन त्यांची तपासणी करतात. ग्रामपंचायींनी त्यांना पिण्याचे पाणी तसेच इतर साहित्यांचा पुरवठा करत आहे. या सर्वाचा या गावाला नक्कीच फायदा होणार आहे. अतिशय आदर्श असे काम या ठिकाणी सुरु असून जिल्ह्यातील इतर गावांनीही याचे अनुकरण करणे आवश्यक आहे. कोरोना संक्रमनाची साखळी तोडण्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे.