सांगली : महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या सध्या स्थिर असली तरी, पाॅझिटिव्हिटी रेट मात्र कमी झालेला नाही. अजूनही शहरातील पाॅझिटिव्हिटी रेट २५ टक्क्यापेक्षा अधिक आहे, तर मृत्यू दर गेल्या आठवड्यापासून २.७ टक्के असून मेच्या सुरुवातीपेक्षा तो अधिकच आहे. सध्या कडक लाॅकडाऊन असला तरी, कोरोना रुग्णांची संख्या कमी न झाल्याने लाॅकडाऊनचा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा संसर्ग अजूनही कमी झालेला नाही. दररोज हजार ते बाराशे रुग्ण सापडत आहेत. ग्रामीण भागासह शहरातील रुग्णांची संख्याही स्थिर आहे. महापालिका क्षेत्रात दररोज सरासरी १५० ते १६० रुग्ण सापडत आहेत. त्यापैकी ८० टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने होम आयसोलेशन केले जात आहे. सध्या दीड हजार रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
महापालिका क्षेत्रात आतापर्यंत २७ हजार ४५५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी २५ हजार रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ८७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पालिकेच्या आरोग्य केंद्रातून दररोज ६०० अँटिजन व आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्यांची संख्या व रुग्णसंख्येची तुलना करता, शहरातील पाॅझिटिव्हिटी रेट २५ टक्क्यापेक्षाही अधिक असल्याचे दिसून येते. आठवड्यातील काही दिवस हाच रेट ४० टक्क्यापर्यंत गेल्याचेही आकडेवारीवरून दिसून येते. मेच्या पहिल्या पंधरवड्यात शहरातील मृत्यू दर २.६ टक्के होता, तर दुसऱ्या पंधरवड्यात हाच दर २.७ टक्के आहे.
कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आल्याशिवाय लाॅकडाऊनमध्ये शिथिलता मिळणार नाही. कडक लाॅकडाऊन असूनही शहरात घराबाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. त्यात भाजपसह राजकीय पक्ष, व्यापारी संघटनांनी लाॅकडाऊन शिथिल करण्याची मागणी केली आहे. पण सद्यस्थिती पाहता, जूनमध्येही लाॅकडाऊन कायमच राहण्याची शक्यता अधिक आहे.
चौकट
रिकव्हरी रेट चांगला
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एक एप्रिलपासून आजअखेर ९ हजार ७०० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी दीड हजार रुग्ण उपचाराखाली आहेत. दररोज शहरातील १२० ते १३० रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत, तर १६० रुग्ण सापडत आहेत. बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यापेक्षा अधिक असले तरी, ते आणखी वाढण्याची गरज आहे.
चौकट
शहरात असा राहिला आठवडा...
दिनांक चाचण्या बाधित मृत्यू
२२ मे ६४२ २२८ ५
२३ मे ४२१ १९१ ११
२४ मे ५३७ ११९ १०
२५ मे ५९१ १९४ ६
२६ मे ४७६ १९२ २
२७ मे ५५७ १३९ ५