मोहन बाबर- येळावी-तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू झाले असून, पश्चिम ग्रामीण भागातील येळावी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आर. आर. पाटील आबांच्या पश्चात आत्मविश्वास गमावून बसल्याचे चित्र आहे. मात्र याउलट भाजपच्या खासदार गटाने बाजार समिती व जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत यश मिळविल्याने कार्यकर्ते ‘अच्छे दिन’चे स्वप्न रंगवण्यात गुंग आहेत. या घडामोडींवर बारीक लक्ष देऊन पाया मजबूत करण्याच्या इराद्याने कॉँग्रेसने कंबर कसली आहे.राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र आत्मविश्वास हरवून बसले असून, वरिष्ठ पातळीवरून त्यांचे मनोधैर्य उंचावण्याचे काम सुरू असल्याचे चित्र आहे. याउलट भाजपचा झेंडा फडकविण्याच्या खासदार संजय पाटील यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे कार्यकर्त्यांमध्ये बदल झाले आहेत. श्रेयवादामुळे मात्र त्यांना एकसंधता साधणे कठीण होऊन बसले आहे. राष्ट्रवादीचा आबा गट व संजय पाटील यांचा भाजपवासी गट कायम एकमेकांविरोधात राहतात, तर कॉँग्रेसला मात्र चांगले वातावरण निर्माण झाले आहे. कॉँग्रेसने बाजार समितीच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीशी सख्य असल्याचे दाखवून दिले होते. यासाठी स्थानिक पातळीरून मोठ्या प्रमाणात साहाय्य झाल्याचे दिसून आले. येळावी ग्रामपंचायतीच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या राष्ट्रवादीतील आबा-संजयकाका गटांच्या संयुक्त पॅनेलने सामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत. पिण्याचे पाणी, सार्वजनिक रस्ते, व्यापारी गाळे, रोहयोतील भ्रष्टाचार यामुळे सामान्यांच्या मनात सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी निर्माण झाली आहे. कॉँग्रेसचे वर्चस्व असणाऱ्या सिद्धेश्वर शिक्षण संस्था व येळावी विकास सोसायटीच्या स्वच्छ व पारदर्शी कारभाराचा फायदा कॉँग्रेसला मिळणार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे सभापती अनिल पाटील हे विजय पाटील गटाबरोबर हातमिळवणी करून एकत्र पॅनेल उभे करण्याच्या तयारीत आहेत. यावेळी येळावी ग्रामपंचायत निवडणूक गावकी आणि भावकीच्या संबंधापलीकडे गेल्याचे दिसून येते. सरपंचपद इतर मागास पुरुषांसाठी राखीव आहे. त्यातच नऊपैकी आठ जागांवर असणाऱ्या महिला उमेदवार शोधण्यासाठी नेत्यांची दमछाक होत आहे.तासगाव तालुक्यात मणेराजुरीपाठोपाठ मोठी लोकसंख्या असणाऱ्या येळावी ग्रामपंचायतीकडे नेत्यांचे विशेष लक्ष असल्याचे चित्र आहे. कार्यकर्त्यांची मनधरणी राजकीय समीकरणे लक्षात घेऊन राष्ट्रवादी व भाजप नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर पूर्णत: लक्ष केंद्रित केले असून, कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यापासून गटा-तटाच्या बैठकांवर भर दिला जात आहे. कॉँग्रेसला मात्र चांगले वातावरण निर्माण झाले आहे. कॉँग्रेसचे विजयअण्णा पाटील यांनी बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीशी सख्य असल्याचे यापूर्वीच्या निवडणुकीत दाखवून दिले होते.
काँग्रेसला अच्छे दिन येण्याची शक्यता
By admin | Published: October 09, 2015 10:54 PM