लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा प्रशासनाकडे दाखल होणाऱ्या प्रत्येक कागदपत्रांचा प्रवास सर्वांना कळावा, म्हणून मंगळवार, ११ जुलैपासून ई-ट्रॅकिंगची अंमलबजावणी सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यातील महसूल विभागाचा कारभार पारदर्शीपणाने आणि गतीने कार्यरत व्हावा, म्हणून गेला महिनाभर आमचे प्रयत्न सुरू आहेत. झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल (दैनंदिन निपटारा) यावर सर्वाधिक लक्ष दिले आहे. जिल्ह्यातील अनेक महसुली कार्यालयांमध्ये कागदपत्रांचा बेशिस्तपणा दिसून आला. तहसील किंवा अन्य कोणत्याही कार्यालयात येणाऱ्या पत्रांच्या नोंदी कार्यविवरण नोंदवहीत होत नाहीत. त्यामुळे कागदांच्या ढिगाऱ्यात हरविलेली कार्यालये निदर्शनास आली आहेत. हा सर्व प्रकार दुरुस्त करून कार्यालयांमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक अर्जाची, पत्रांची नोंद रितसर होऊन त्यांचा तातडीने निपटारा करावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यासाठीच मंगळवारपासून टपाल ई-ट्रॅकिंग सॉफ्टवेअर सुरू करण्यात येणार आहे. कागदपत्रे दाबून ठेवण्याचा प्रकार मंगळवारपासून बंद होईल. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कागदाचा महसूल विभागातील प्रवास रोजच्या रोज कळू शकेल. झिरो पेंडन्सी योजनेसाठी याचा लाभ होणार आहे. सेतू कार्यालयांमधील कागदपत्रांचाही निपटारा रोजच्या रोज होईल आणि विद्यार्थी, पालकांना तातडीने दाखले मिळतील, याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील ११ सेतू कार्यालयांवर तहसीलदारांनी दररोजचा ‘वॉच’ सुरू केला आहे. त्यामुळे सेतू कार्यालयातील कामकाजामध्ये लवकरच बदल होईल. महसूल विभागाच्या १ लाख ३ हजार कागदपत्रांचे स्कॅनिंग करून ती संगणकावर घेतली असली तरी, सॉफ्टवेअरचा वापर अद्याप त्यासाठी होत नाही. संगणकीय सात-बारा योजनेत सांगली जिल्हा गत महिन्यात राज्यात शेवटून दुसऱ्या क्रमांकावर होता. मी पदभार घेतल्यानंतर या विषयात लक्ष घातले आणि आता तब्बल ७ क्रमांकाने जिल्हा पुढे आला आहे. लवकरच पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये आपला समावेश होईल, यादृष्टीने काम सुरू आहे. संगणकीय सात-बारा नोंदीची टक्केवारी ७९.९२ वरून आता ९४.२९ टक्क्यांवर गेली आहे. जलयुक्त शिवारची उद्दिष्टपूर्ती जुलैअखेरजलयुक्त शिवार योजनेच्या कामात सर्वाधिक लक्ष घातले आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावरील कामांच्या आकडेवारीत तफावत असल्याने ती प्रथम दुरुस्त केली आहे. जलयुक्तच्या ४ हजार ३२ कामांचे उद्दिष्ट जिल्ह्यासमोर होते. आजअखेर यातील ३ हजार ४५३ कामे पूर्ण झाली असून, १ हजार २५७ कामे प्रगतीपथावर आहेत. येत्या ३१ जुलैअखेर उद्दिष्टपूर्ती होईल, असा विश्वासही विजयकुमार काळम-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रशासनात आजपासून टपाल ई-ट्रॅकिंग
By admin | Published: July 10, 2017 11:50 PM