लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गल्लीतील दादा रुपयाच्या पोस्टरवर झळकू लागले आहेत. हातात आणि गळ्यात एक ग्रॅमचा दागिना घालून लाखाचा रुबाब करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत आहे. विविध मुख्य चौकातील कोपरे डिजिटल पोस्टरने व्यापल्याने शहर विद्रुपीकरणाकडे वाटचाल करीत आहे.
आगामी पालिका निवडणूक एकल प्रभाग रचनेमुळे कमी बजेट असल्याचे ग्राह्य मानून नेत्यांसह गल्लीबोळातील फाळकूटदादा वाढदिवस साजरे करू लागले आहेत. चौकातील लागलेले डिजिटल जुनी पोस्टर्स रात्री चोरून त्या फ्रेमवर रुपयाच्या किमतीच्या आपल्या छब्या चिटकवून झळकणे हा नवीन राजकीय फंडा शहरात आला आहे. त्यामुळे मुख्य चौकात पोस्टर युद्ध चांगलेच भडकले आहे. यावर पालिका प्रशासनाचे नियंत्रण नाही. वाढदिवस होऊन गेला तरी पोस्टरची लक्तरे होईपर्यंत तेथेच या नेत्यांचे चेहरे लटकलेले दिसतात.
वाढदिवस म्हणजे पैशाचा खेळ आला. यासाठी सामजिक कार्याचा बुरखा पांघरूण वर्गणीच्या नावाने खंडणी गोळा करणाऱ्या फाळकूटदादांची संख्या वाढू लागली आहे. यामध्ये काही व्हाइट कॉलरचे नेतेही सामील आहेत. दिवसा शुद्ध शाकाहारी किंवा मसुरा धाब्यावर दम देऊन फुकट हादडायचं आणि रात्री बारमध्ये जाऊन मोफतची डोसायची, हा त्यांचा नित्यनियमाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. यातूनच खंडणी आणि हाणामारीचे गुन्हे घडत आहेत. येथुन पुढेही अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.
इस्लामपुरात आगामी पालिका निवडणुकीची चाहूल लागताच काही नेत्यांचा मोठ्या प्रमाणात वाढदिवस करण्याकडे कल झुकला आहे. स्वत: पैसे खर्च करून गल्लीबोळांतील कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा घेतलेल्या डिजिटल पोस्टरवर गुन्हेगारी क्षेत्रातील युवकांचा अधिकच भरणा दिसत आहे. यातून काही कार्यकर्ते आगामी पालिकेत जाण्याची तयारी करीत आहेत.
फोटो - १७०२२०२१-आयएसएलएम-कार्टून