पाणी पुरवठा समिती, तांत्रिक सेवा पुरवठादार आणि ठेकेदारांना महिन्यात कामे पूर्ण करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत. या कालावधित काम पूर्ण न झाल्यास दोषींच्या मालमत्तांवर बोजा चढवून योजनांच्या कामाची रक्कम वसुल करण्याचा इशाराही डुडी यांनी दिला आहे.
जत तालुका शंभर टक्के दुष्काळी आहे. म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांमुळे काही भागामध्ये सध्या पाणी आहे. पण पिण्याच्या पाण्याची तर नेहमीच टंचाई आहे. जत तालुक्यातील गावांसाठी भारत निर्माण, स्वजलधारा, जलस्वराज आदी योजनांमधून पाणी पुरवठा योजना मंजूर आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही ४८ गावांमधील पाणी पुरवठा योजना गेल्या दहा वर्षांपासून अपूर्ण आहेत. सूचना देऊनही गावांनी पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण केली नाहीत. या प्रकरणात डुडी यांनी गंभीर लक्ष घातले असून दि. १६ डिसेंबर रोजी जत येथे भेट देऊन पाणी योजनांची कामे पाहणार आहेत. अपूर्ण योजनांच्या कामाचा आढावाही घेणार आहेत. गावातील पाणी पुरवठा समिती अध्यक्ष, सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार, तांत्रिक सेवा पुरवठादार यांनी पाणी योजनांची अपूर्ण कामे पूर्ण करावीत, अन्यथा दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. त्यांच्यावर थकीत कामाच्या रकमेची जबाबदारी निश्चित करून त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात येणार आहे. यामुळे संबंधित गावांनी एका महिन्यात कामे पूर्ण करून गावाला पाणी पुरवठा सुरू करावा, असे आदेश डुडी यांनी दिले आहेत.
चौकट
चार लाख कुटुंबांना पाणी कनेक्शन
जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला माणसी ५५ लिटर पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी अपूर्ण पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्याला प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला पाणी कनेक्शन देण्यात येणार आहे. त्यानुसार चार लाख कुटुंबांना पाणी कनेक्शन देण्याची मोहीम चालू आहे, असे डुडी यांनी सांगितले.