फोटो ओळी :-
महापालिकेच्या व्यवसाय परवाना नोंदणीला स्थगिती द्यावी, अशी मागणी व्यापारी एकता असोसिएशनच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना अध्यक्ष समीर शहा यांनी दिले. यावेळी संजय बजाज, शेखर माने, सोमेश बाफना, सुदर्शन माने उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेने व्यवसाय परवाना नोंदणीला एक वर्षाकरिता स्थगिती द्यावी व कोणतीही शास्ती किंवा व्याज आकारू नये, अशी मागणी व्यापारी एकता असोसिएशनच्यावतीने महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्याकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन महापौर सूर्यवंशी यांना देण्यात आले.
समीर शहा म्हणाले की, महापालिका क्षेत्रात व्यवसाय परवाना घेण्यासाठी शिबिरे सुरू आहेत. जे व्यापारी परवाना घेणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. सध्या व्यापारी आर्थिक संकटात आहेत. महापूर व कोविडमुळे आर्थिक संकट आले आहे. यातून व्यापारी अद्याप सावरलेला नाही. या काळात राज्य व महापालिका प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यातच पुन्हा कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. व्यापारी वर्ग अडचणीत असून महापालिकेकडून किमान दिलासा देण्याची गरज आहे. महापालिकेने व्यवसाय परवाना नोंदणीला किमान एक वर्षाकरिता स्थगिती द्यावी व कोणतीही शास्ती किंवा व्याज आकारू नये, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी व्यापारी एकता असोसिएशनचे समीर शहा, सुरेश पटेल, सोनेश बाफना, धीरेन शहा, सुदर्शन माने, मुकेश चावला, दिलीप शहा, विजय लड्डा आदी उपस्थित होते.