इस्लामपूर : येथील उपजिल्हा रुग्णालयात महिन्याभरापूर्वी सुरू करण्यात आलेले दिव्यांग तपासणी आणि दिव्यांग दाखला वितरित करण्याचे काम कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने स्थगित करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.नरसिंग देशमुख यांनी दिली.
येथील उपजिल्हा रुग्णालात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने दिव्यांग तपासणी व दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र वितरित करणारा कक्ष सुरू करण्यात आला होता. महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या शनिवारी येथे दिव्यांगाची तपासणी करून तसे दाखले दिले जात होते.
डॉ.देशमुख म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करणारा कक्ष सुरू करण्यात आला आहे. सध्या या ठिकाणी कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिव्यांग तपासणी आणि दाखले वितरण करण्याचे काम पुढील आदेश होईपर्यंत थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.
चौकट
दिव्यांगांनी नोंद घ्यावी
येथील उपजिल्हा रुग्णालयात सध्या कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे हा परिसर सामान्य व्यक्तींकरिता प्रतिबंधित करण्यात आला आहे. त्यामुळे वाळवा-शिराळा तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींनी तपासणी अथवा दाखले घेण्यासाठी येऊ नये, असे आवाहन डॉ.देशमुख यांनी केले आहे.