सांगली : जिल्हा बँकेने सेक्युरिटायझेशन ॲक्टअंतर्गत खरेदी केलेल्या कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेस पुणे येथील ऋण वसुली प्राधिकरणाने (डीआरटी) स्थगिती दिली आहे.
महांकाली कारखान्याने यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १७ डिसेंबर रोजी होणार आहे. महांकाली साखर कारखान्याकडे सुमारे १३२ कोटींचे कर्ज आहे. जिल्हा बॅँकेने केलेल्या मूल्यांकनात कारखान्याची मालमत्ता आधी ८२ कोटी व नंतर ८६ कोटी झाली. त्यामुळे हीच राखीव किंमत ठेवत बॅँकेने या कारखान्याचा फेब्रुवारी २०२० मध्ये लिलाव काढला होता. जिल्हा बॅँकेने कायद्यातील तरतुदीनुसार हा कारखाना विकत घेतला. कारखान्याच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून तसे प्रमाणपत्र घेण्यात आले.
कारखान्याच्या कर्ज खात्याला ८६ कोटींची रक्कम वर्ग करून ते खाते नील करण्यात आले. मात्र, व्याज बाजूला काढण्यात आले असून, त्यांची येणेबाकी कारखान्याच्या नावावर आहे. जिल्हा बॅँकेने कारखाना खरेदी केल्यावर पुन्हा बॅँकेच्यावतीने त्याची विक्री तसेच भाडयाने चालवण्यास देण्यासाठी निविदा काढली. दरम्यान, या कारवाईला महांकाली साखर कारखान्याने डीआटीमध्ये आव्हान दिले. यावर नुकतीच सुनावणी झाली. यात कारखान्याच्यावतीने ॲड. एन. के. खासबागदार यांनी, तर बॅँकेच्यावतीने ॲड. वैद्य यांनी म्हणणे मांडले. ॲड खासबागदार यांनी जिल्हा बॅँकेची कारवाई चुकीची असल्याचे सांगितले. बॅँकेने फेब्रुवारी व मार्चमध्ये लिलाव काढला; पण त्यापूर्वीच कारखान्याने बॅँकेला हे कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली होती. तसे लेखी पत्रही दिले होते. महांकाली कारखान्याची मालमत्ता सुमारे २४० कोटींची आहे.
कारखान्याची शहराच्या मध्यभागात १८९ एकर जमीन आहे. यातील ४० ते ५० एकर जमीन विक्री केली असती, तरी बॅँकेचे कर्ज एकरकमी भागले असते. तसा प्रस्तावही कारखान्याने बॅँकेला दिला होता. असे म्हणणे कारखान्याच्यावतीने डीआरटीसमोर मांडण्यात आले. यावर म्हणणे सादर करण्यासाठी जिल्हा बॅँकेने वेळ मागितली आहे. त्यानुसार डीआरटीने बँकेला वेळ दिला असून, तोपर्यंत कारखान्याची विक्री न करता जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.