केशव जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कंपुसेगाव : जुलै महिना अर्ध्यावर आला तरीही खटाव तालुक्यात पावसाने दडी मारल्याने पुसेगाव येथील बटाटा बियाणे बाजारपेठेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे जाणवत आहे. राज्यात खेड, मंचर नंतरची पुसेगावही बटाटा बियाणे व्यापाराची दुसरी मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. असे असले तरी पावसाअभावी तसेच गतवर्षी झालेल्या प्रचंड आर्थिक तोट्यामुळे या बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. या भागातील विहिरी तसेच नेर तलावाच्या पाण्याची पातळीत पुरेशीही वाढ न झाल्याने शेतकरी कोणत्याही प्रकारचे धाडस करण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.खटाव तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात असला तरी या तालुक्याचा उत्तर भाग उंच पठारावर आहे. त्यामुळे येथील हवामान थंड असते. बटाटा पिकास पोषक असल्याने पुसेगावसह परिसरातील असंख्य गावात बटाटा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तसेच या बाजारपेठेत खात्रीशीर बटाटा बियाणे मिळत असल्याने सांगली, सोलापूर, विटा, खानापूर, कोरेगाव, सातारा, फलटण, कऱ्हाड आदी भागांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात येथूनच बटाटा बियाणे खरेदी करतात. दरवर्षी सुमारे ४०० ट्रक बटाटा बियाण्यांची विक्री होत असते. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल खरीप हंगामात याच बाजारपेठेत होत असते. या बटाटा बाजारपेठेमुळे खतविक्रेते,औषधविक्रते, बारदाना व्यापारी, वाहनमालक यांनाही चांगलीच चलती राहते. तसेच बटाटा व्यापारी त्यांचे कर्मचारी, वाहन मालक, हमाल,शेतमजूर अशा अनेकांचे चरितार्थ पुसेगावच्या या बटाटा बाजारपेठेवरच अवलंबून असतात. पुसेगाव परिसरातील वाड्या-वस्तीवरील समारे १५० च्यावर लोकांना बटाटा बियाण्यांच्या वाहतुकीसाठी वाहनात मालाची पोती व खतांच्या पोत्यांची चढउतार करण्याचा हमालीचा रोजगारही उपलब्ध होत असतो. सध्या पावसाअभावी विहिरी तसेच पाझर तलाव, शेततळी यांच्यातील पाण्याचा साठा संपुष्ठात येऊ लागल्याने शेतकरी वर्गात अद्याप तरी बियाणे खरेदीसाठी उत्साह जाणवत नाही. तसेच गतवर्षी बटाटा बियाण्यांचे दर तुलनेने जास्त होते. मात्र, निर्सगाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना बटाटा पीक उत्पादन चांगले काढता आले नाही. त्यातच बटाटा निघाल्यानंतर ही बटाट्याचे बाजारभाव चांगलेच कोसळल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला होता. भागातील सुमारे २५ टक्के शेतकऱ्यांना तर शेतात घातलेले भांडवलही मिळाले नव्हते. त्यामुळे यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी वाटाणा, सोयाबीन अशा पिकांची पेरणी पण उरकलेली असल्याने बटाटा लावण्यासाठीचे क्षेत्र तुलनेने कमी झाले आहे. जर येत्या आठ दिवसांत समाधानकारक पाऊस झालाच तर शेतकरी निश्चितच बटाटा बियाणे खरेदीसाठी आग्रही राहतील, अशी अशा बटाटा बियाणे विक्रते व्यापाऱ्यांना आहे. अद्याप शेतकऱ्यांनी या बटाटा बियाणे खरेदीकडे पाठ फिरवल्याचे जाणवत आहे. निसर्गाच्या हातात सर्व काही... सध्या खरीप हंगामासाठी वविध वाणांचे बटाटा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहत. या बटाटा बियाण्यांच्या विक्रीचे दर प्रतिक्विंटल सुमारे ११०० रुपये ते १५०० रुपयांपर्यंत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत या विक्री दरात बरीच घट झाली आहे. गेल्यावर्षी याच बियाण्यांचे दर प्रतिक्विटंल २५०० ते ३५०० रुपये इतके होते. एकरी ५ ते ७ क्विटंल बटाटा तर ३ ते ४ क्विंटल बटाटा बोर बियाणे लागवडीसाठी लागत असून, त्यासाठी सुमारे १० हजार रुपये तर खते, औषधे, लागवड, भांगलण व अन्य कारणांसाठी सुमारे १५ हजार रुपये असे एकूण सुमारे २५ ते ३० हजार रुपये शेतकऱ्यांना एका एकरासाठी मोजावे लागतात. एवढे करून सुद्धा शेवटी निर्सगाच्या हातात सर्व काही. असे असले तरी शेतकरी मोठ्या अपेक्षेने या भांडवली पिकाची लागवड करत असतात.
पावसाअभावी बटाटा बियाण्याला ‘टाटा’
By admin | Published: July 10, 2017 11:32 PM