खामखेडा : वाढत्या उष्ण व बदलत्या हवामानात पोल्ट्री फार्ममधील पक्षी जगू शकत नसल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. परिणामी पोल्ट्री फॉर्म शेड ओसाड पडत आहेत. वीस वर्षांपूर्वी शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणून गायी, म्हशी, बकरी पाळत. दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करीत. त्याचबरोबर गावठी कोंबड्याही पाळत असत.जसजसा शेतीचा विकास होत गेला तसतसा शेतीपूरक जोडधंद्यांमध्येही बदल होत गेला. दुय्यम दर्जाच्या व्यवसायाची गरज भासू लागल्याने व जोडधंद्यातून पैसा मिळू लागल्याने शेतकरी पोल्ट्री व्यवसायाकडे वळू लागले. खामखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री शेडमध्ये वाढ झाली आहे. पोल्ट्री बांधकामासाठी जेवढा खर्च येतो, त्यापेक्षा जास्त शेड उभारणीसाठी येतो. गावातील सोसायटी, बँका या व्यवसायासाठी कर्जपुरवठा करू लागल्याने अनेक शेतकऱ्यांचे सुशिक्षित मुले नोकरीऐवजी पोल्ट्री व्यवसायाकडे वळले आहेत.कुक्कुट पालनातून चार पैसे हाती येऊ लागल्याने अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळले. चालू वर्षी अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे. कोंबड्यांसाठी थंड हवामान पोषक असते. उष्ण हवामानामुळे कोंबड्यांचा मृत्यू होतो. उष्ण हवामाना-पासून पक्ष्यांचा बचाव करण्यासाठी पोल्ट्री शेडच्या पत्र्यांवर उसाचे पाचड, बारदान, नारळाच्या झाडाच्या फांद्या इत्यादि टाकून थंडावा निर्माण केला जात आहे. एवढे करूनही या वर्षाचे वातावरण पोल्ट्री व्यवसायासाठी पोषक नाही. यामुळे अनेक पोल्ट्री कंपन्यांनी पोल्ट्री शेडमध्ये पिल्ले न टाकल्याने अनेक शेड रिकामे दिसत आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायासाठी सोसायट्या, बँकांकडून घेतलेले कर्ज कसे परत करावे याची चिंता पोल्ट्री व्यावसायिक करीत आहेत. (वार्ताहर)
उष्ण हवामानामुळे कुक्कुटपालन धोक्यात
By admin | Published: April 12, 2016 10:46 PM