सांगली : देशात व राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागामार्फत सतर्कता बाळण्यात आली आहे. विविध उपाययोजना हाती घेतल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. ए. धकाते यांनी दिली.
पोल्ट्रीतील पक्षी, वन्य पक्षी, स्थलांतरीत पक्षी यांच्यात एव्हिएन इन्फ्लूएन्झा (बर्ड फ्ल्यू) ची लक्षणे दिसल्यास अथवा जास्त मृत्यू झाल्यास वरिष्ठांना तात्काळ कळविण्याचे आदेश पशुवैद्यकांना दिले आहेत. हा रोग अत्यंत सांसर्गिक असून पक्ष्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अचानक मरतूक होते. पक्ष्यांची भूक मंदावते. डोके, पापण्या, तुरे व कल्ले, पाय सुजतात. नाकातून स्त्राव वाहतो. तुरा, कल्ला जांभळट होतो. खोकणे, शिंकणे तसेच हागवण अशी लक्षणे आढळतात.
अशी घाऊक मरतूक अथवा लक्षणे आढळल्यास तात्काळ पशुसंवर्धन विभागाला कळविण्याचे आवाहन केले आहे. ग्रामपंचायतींनी ७ ग्राम धुण्याच्या सोड्याचे १ लिटर पाण्यात मिश्रण करुन खुराडे, गोठे, गटारीवर १५ दिवसांच्या अंतराने तीनवेळा फवारणी करावी. संशयित क्षेत्रावरून पक्षांची वाहतूक पूर्ण बंद करण्याचा प्रस्ताव आहे. संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांनी स्वच्छतेची पुरेपूर काळजी घ्यावी असे डॉ. धकाते म्हणाले.
पक्ष्यांच्या मृत्यूंवर पशुसंवर्धनची नजर
n स्थानिक पक्षीप्रेमी, संस्था, अभ्यासकांच्या माध्यमातून पक्ष्यांवर नजर ठेवण्यात येत आहे.
n पाळीव पक्षी तसेच जलाशयावर सस्थलांतरीत होणाऱ्या पक्ष्यांवरही लक्ष ठेवले जात आहे.
n कोंबडीची जिल्हा व तालुकास्तरावर दक्षता पथके स्थापन करण्यात आली आहेत.
n धुण्याच्या सोड्याचे द्रावण गोठ्यात, पोल्ट्रीत फवारण्याच्या सूचना आहेत.
मृत पक्ष्याचे शवविच्छेदन स्वत: करु नका !
बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रमानुसार क्लोकल नमुने, ट्रकिअल नमुने व रक्त-जल नमुने संकलीत करुन रोग अन्वेषण प्रयोगशाळेत पाठविण्याच्या सूचना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पोल्ट्री किंवा अन्यत्र मृत पक्षी आढळल्यास नागरीकांनी स्वत: न हाताळता किंवा शवविच्छेदन न करता पशुवैद्यकीय विभागास कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बर्ड फ्लूचा संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्ह्यात उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पोल्ट्री फार्म्समध्ये जैवसुरक्षितता उपाय राबवून पक्ष्यांची मर रोखली जात आहे.
- डॉ. संजय धकाते, पशु उपायुक्त
-----------