मालगाव : कोरोनाबाधितांचा ऑक्सिजन पुरवठा अखंडित राहण्यासाठी वीजपुरवठा बंद करू नये, अशी मागणी भाजप कार्यकारिणी सदस्य रविकांत साळुंखे यांनी केली.
महावितरणला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण कॉन्सन्ट्रेटरच्या मदतीने ऑक्सिजन घेत आहेत. रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने त्यांना घरीच राहावे लागत आहे. अनेक रुग्ण घरगुती विलगीकरणात आहेत. ऑक्सिजन पातळी कमी होईल त्यानुसार त्यांना कृत्रिम यंत्रणेद्वारा ऑक्सिजन घ्यावा लागतो; पण वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत होत आहे. यामुळे रुग्णांचे प्राणही धोक्यात येत आहेत.
मिरज पूर्व भागात आरग, मालगाव, बेडग आदी गावांत रुग्णसंख्या जास्त आहे, त्यामुळे तेथे सुरळीत वीजपुरवठ्याची गरज आहे. विविध सामाजिक संस्थांनी पुरविलेली ऑक्सिजन यंत्रे विजेअभावी बंद राहत आहेत. त्यामुळे वीजपुरवठा अखंडित राहील यासाठी महावितरणने प्रयत्न करणे गरजेचे आहे. या भागात मंगळवारच्या भारनियमनाव्यतिरिक्त अन्य दिवशीदेखील तासन्तास वीज बंद राहत आहे. आरग, म्हैसाळ, एरंडोली आदी गावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णसेवेलाही त्याचा फटका बसत आहे. बंद वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्यासाठीही प्रयत्न होत नाहीत.