सांगली : शिवोदयनगर परिसरात गुरुवारी रात्री काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळी वारे व पावसामुळे येथील विद्युत जनित्रात बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत विद्युत कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करून विद्युतपुरवठा सुरळीत केला. या परिसरात वारंवार थोड्या पावसातही यंत्रणा नादुरुस्त होत असल्याने त्याच्या बळकटीकरणाची मागणी होत आहे.
चिखलमय रस्त्यात अडकली वाहने
सांगली : शहरातील वसंतदादा कारखाना परिसर, लक्ष्मीनगर ते अजिंक्यनगर रस्ता, शिवोदयनगर या परिसरात पावसामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत. काही ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाले आहेत. ड्रेनेजच्या कामासाठी केलेल्या खोदकामामुळे हे रस्ते पावसात चिखलमय होत आहेत. त्यामुळे त्यांच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.
कोविड रुग्णांचे कपडे उघड्यावर
सांगली : शहरातील अनेक कोविड रुग्णांनी वापरलेले कपडे व अन्य वस्तू कर्नाळ रस्त्याच्या कडेला टाकले जात आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. रेल्वे गेटपासून येथील एका मंगल कार्यालयापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असा कचरा टाकला जात आहे.
बसस्थानकाच्या जागेत पावसाने दलदल
सांगली : माधवनगर जकात नाक्यासमोरील बसस्थानकाच्या आरक्षित जागेत पावसामुळे दलदल निर्माण झाली आहे. या जागेत कचरा व सांडपाणी सोडले जात असल्याने दुर्गंधी पसरली आहे. कोरोनाकाळात नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे जागेच्या स्वच्छतेची मागणी केली जात आहे.