लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील प्रसिद्ध कवी व कासेगाव शिक्षण संस्थेतील मराठी विषयाचे प्रा. प्रदीप पाटील यांच्या ‘अंतरीचा भेद’ या कवितासंग्रहाची बडोदाच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठ बडोदाच्या बी.ए. तृतीय वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये पाठ्यपुस्तक म्हणून निवड झाली आहे. तसेच एम.ए.च्या ‘मॉडर्न मराठी पोएट्री’च्या अभ्यासक्रमातही या कवितासंग्रहाचा अंतर्भाव केला आहे. बडोदा विद्यापीठाचे बोर्ड ऑफ स्टडिज इन मराठी लॅण्ग्वेज अँड लिटरेचरचे चेअरमन व मराठी विभागप्रमुख डॉ. संजय करंदीकर यांनी पत्राद्वारे त्यांना कळविले आहे.
नव्वदनंतरच्या मराठी कवितेत महत्त्वाचे कवी म्हणून प्रा. पाटील ओळखले जातात. यापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या नववीच्या अभ्यासक्रमामध्ये, कर्नाटक राज्याच्या बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये, तसेच सोलापूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या अभ्यासक्रमांमध्येही त्यांच्या कवितांचा समावेश झालेला आहे.
त्यांचे ‘आत्मसंवाद’ व ‘अंतरीचा भेद’ हे दोन कवितासंग्रह प्रकाशित असून, त्यांना महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्कारासह कोकण मराठी साहित्य परिषदेचा मराठी कविता राजधानी पुरस्कार, मुक्त विद्यापीठाचा विशाखा प्रथम पुरस्कार, पद्मश्री विखेपाटील, यशवंतराव चव्हाण, मराठवाडा साहित्य परिषद पुरस्कार असे प्रतिष्ठेचे विविध सन्मान लाभले आहेत. त्यांचे कवितासंग्रहासह दोन ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
कविश्रेष्ठ दिलीप पुरुषोत्तम चित्रे, प्रा. म. द. हातकणंगलेकर, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले,डॉ. श्रीपाल सबनीस, आदी मान्यवरांनी त्यांच्या कवितेची समीक्षा केली आहे. त्यांच्या कवितेवरील पासष्टहून अधिक समीक्षालेख प्रतिष्ठित वाङ्मयीन नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहेत. मराठीतील गंभीर कविता लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी ‘आमचे जगणे आमची कविता’ या कार्यक्रमाची निर्मिती केली. त्याचे प्रयोग महाराष्ट्राबरोबरच गुजरात, तेलंगणा, आदी राज्यांमध्येही केले.
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलेल्या आविष्कार कल्चरल ग्रुपचे ते कार्याध्यक्ष असून, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इस्लामपूर शाखेचे अध्यक्ष आहेत. सध्या ते आष्टा येथील आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजमध्ये अध्यापनाचे कार्य करतात.