संख : जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटी व संविधान विचार मंच (मंगळवेढा) यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जाडरबोबलाद (ता. जत) येथील प्रज्ञा बाबासाहेब काटे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला. ती रामराव विद्यामंदिरची विद्यार्थिनी आहे.
दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण, प्रा. डॉ. संजय शिवशरण यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. भारतीय संविधानाने आपणास काय दिले, या विषयावर ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. द्वितीय क्रमांक तनिष्का अनंतराव तेलभरे, (सेलू, परभणी), तृतीय क्रमांक धनराज रघुनाथ दुर्योधन बामनवाडा (राजुरा, चंद्रपूर) यांनी मिळविला. विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र, संविधानाची प्रत देण्यात आले. दिगंबर कुचेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर महेंद्र वाघमारे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिवाजी बेलभंडारे, गौराप्पा गायकवाड, दामाजी शिवशरण, राधेश्याम कांबळे, बाबासाहेब काटे, सचिन गालफाडे उपस्थित होते.
फोटो ओळ : जाडरबोबलाद (ता. जत) येथील प्रज्ञा बाबासाहेब काटे हिचा सत्कार सचिन शिवशरण, प्रा. डॉ. संजय शिवशरण यांच्या हस्ते करण्यात आला.