लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील प्रशासकीय इमारतीमधील प्रांताधिकारी कार्यालयात रात्री तीन तलाठ्यांना बोलावून घेत त्यांना मारहाण केल्याच्या घटनेत प्रथमदर्शनी तथ्य असल्याचा ठपका ठेवत प्रांताधिकारी नागेश पाटील यांची सोलापूर जिल्ह्यात बदली करण्यात आल्याचे आदेश महसूल व वन विभागाचे उपसचिव डॉ. माधव वीर यांनी काढले आहेत.
मार्च महिन्यात प्रांताधिकारी पाटील यांनी महादेव वंजारी, अविनाश पाटील आणि अमर साळुंखे अशा तीन तलाठ्यांना कार्यालयात बोलावून घेऊन मारहाण केली होती. या घटनेनंतर तलाठी कर्मचारी संघटनेने पाटील यांच्या नियंत्रणाखाली काम न करण्याचा इशारा दिला होता. तसेच त्यांच्या बदलीचीही मागणी केली होती. प्रांत पाटील हे नेहमीच वेगवेगळ्या प्रकरणांमधून वादग्रस्त ठरले होते.
तलाठ्यांना मारहाण झाल्याच्या घटनेनंतर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी तीन सदस्यीय समिती नेमून या घटनेची चौकशी केली होती. त्याचा अहवाल पुणे विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला. त्यावर आयुक्तांनी तो १ एप्रिल रोजी शासनाकडे सादर केला. या अहवालामध्ये नागेश पाटील यांच्याविरुद्धच्या तक्रारीमध्ये प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने नागेश पाटील यांची उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र. ७ सोलापूर या पदावर बदली केली आहे.