मिरजेत कन्या महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त कुलकर्णी यांचे ‘संत परंपरेतील गुरू-शिष्य नाते’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यान झाले. प्राचार्य डॉ. शर्वरी कुलकर्णी अध्यक्षस्थानी होत्या.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले, ‘‘लोखंडाला सोने करण्याची ताकद गुरुच्या ज्ञानदानी परिसात असते. म्हणून संत साहित्यात अनेक अंगांनी गुरुचा आदर व्यक्त झाला आहे. इहलोकी जर स्वर्ग निर्माण करायचा असेल तर गुरु प्रज्ञावंत असणे महत्त्वाचे असते. ज्ञान व विद्या मुक्त हस्ते देणाऱ्या गुरुमुळे शिष्य प्रज्ञावंत होतो. केवळ माहितीचा संग्रह म्हणजे ज्ञान नाही. विद्येमुळे व्यक्तीला आत्मभान आले पाहिजे. त्यातून आपल्या विचारांची दिशा ठरवता आली पाहिजे. हे संत साहित्याचे खरे मर्म आहे. म्हणूनच संत चळवळीने सांगितलेला गुरु महिमा आणि गुरू-शिष्य परंपरेचा केलेला जागर आजच्या गूगलकेंद्री व परिस्थितीजन्य ऑनलाइन ज्ञानदानी काळातही अत्यंत महत्त्वाचा आहे.’’
कुलकर्णी यांनी मराठी संत परंपरेतील गुरू-शिष्य नात्याची अनेक उदाहरणे दिली. औपचारिक व अनौपचारिक पद्धतीने गुरु सतत शिष्याला शिकवतो. अंतिमतः प्रत्येक माणूस कायम विद्यार्थीच असतो, याचे भान या परंपरेने ठेवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रा. डॉ. माधुरी देशमुख यांनी स्वागत केले. प्रा. दीपाली आगरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. बाबासाहेब सरगर यांनी तंत्रसहाय्य केले. प्रा. तुषार पाटील यांनी आभार मानले.