ओळी : महिला दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने शहरातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयुक्त नितीन कापडणीस, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, पांडुरंग कोरे, राहुल रोकडे, गीतांजली ढोपे-पाटील, स्वाती शिंदे, सुनंदा राऊत, रोहिणी पाटील, अनारकली कुरणे उपस्थित होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील प्रतापसिंह उद्यानात लवकरच पक्षी आणि मत्स्य संग्रहालय सुरू करणार असल्याची घोषणा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी मिरजेतील महिला दिन कार्यक्रमात केली.
जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीकडून कर्तृत्ववान महिला व कचरावेचक महिलांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी समाजसेविका डॉ. लताताई देशपांडे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमास आयुक्त नितीन कापडणीस, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, महिला बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे-पाटील, नगरसेविका स्वाती शिंदे, अनारकली कुरणे, रोहिणी पाटील, सुनंदा राऊत, उपायुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त दिलीप घोरपडे उपस्थित होते.
आयुक्त कापडणीस म्हणाले की, महिला दिन अनेक उपक्रमांनी साजरा करण्याचे नियोजन होते. मात्र कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे कार्यक्रम घेता आले नाहीत. मात्र कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतील.
शैलेश खोत, स्मिता वाघमोडे, भारती माळी, वैशाली सूर्यवंशी, उमर जमादार आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.