अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विरोधातील पक्षांमध्ये युवक नेत्यांची संख्या जास्त आहे, तर राष्ट्रवादीत मात्र तिसऱ्या फळीतील नेत्यांचा अभाव आहे. त्यामुळे पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्यापुढे विरोधकांचे कडवे आव्हान उभे राहणार आहे.
इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघांत राजारामबापू उद्योग समूहाचे जाळे आहे. तीन साखर कारखाने, बँक, दूध संघ, पाणीपुरवठा संस्था, विविध सहकारी संस्थांची ताकद आहे. तेथे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिवंगत लोकनेते राजारामबापू पाटील, जयंत पाटील यांचे नेतृत्व मानणाऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांनी पदाधिकाऱ्यांच्या खुर्च्या अडवून ठेवल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते संधी आणि पदांपासून वंचित आहेत. परिणामी राष्ट्रवादीत तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा अभाव आहे.
इस्लामपूर मतदारसंघात राजारामबापू पाटील यांच्या घरातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी असलेल्या प्रतीक पाटील यांनी नुकताच स्वत:चा वाढदिवस साजरा केला. गेल्या वर्षभरात त्यांची विविध कार्यक्रमांत असलेली उपस्थिती त्यांची राजकारणातील वाटचाल दर्शवतात. त्यांच्या प्रत्यक्ष पक्षप्रवेशाची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र, त्यांना राष्ट्रवादीतील तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राजारामबापू उद्योग समूह आणि पक्षातील पहिल्या-दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांचा अडसर आहे.
चौकट
विरोधकांकडे तरुण नेतृत्व
इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षांमध्ये रणधीर नाईक, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, विक्रम पाटील, वैभव शिंदे, जयराज पाटील, सागर खोत (सर्वजण भाजप), आनंदराव पवार, अभिजित पाटील, गौरव नायकवडी, भीमराव माने (सर्वजण शिवसेना), जितेंद्र पाटील, वैभव पवार (दोघे काँग्रेस) या युवा नेत्यांची फळी मजबूत आहे, शिवाय निशिकांत पाटील, सत्यजित देशमुख यांचेही नेतृत्व मानणारे गट आहेत. त्यांच्यात मतभेद असले तरी प्रतीक पाटील यांना त्यांचे आव्हान पेलावे लागणार आहे.