अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर राज्यात राष्ट्रवादी भक्कम करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दौरा करत आहेत, तर कोणत्याही परिस्थितीत आगामी पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता काबीज करण्यासाठी त्यांचे पुत्र प्रतीक पाटील यांनी शहरात संपर्क वाढवला आहे.
मागील पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे पानिपत जयंत पाटील यांच्या जिव्हारी लागले आहे. त्यातच राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्य. त्यामुळे राष्ट्रवादीकडून इस्लामपूर पालिका दुर्लक्षित झाली. सत्ताधारी विकास आघाडीत स्वयंभू नेतृत्वाखाली असलेले वेगवेगळे गट पालिकेत तयार झाले. त्यामुळे शहराच्या विकासाला गती आली नाही. त्यातच विरोधी राष्ट्रवादीकडे शहरात खमके नेतृत्व नव्हते. पालिका सभागृहात आवाज उठवण्यात कमी पडले.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाघाडीची सत्ता आली. जयंत पाटील दोन नंबरचे मंत्री झाले, तर पक्षाची जबादारी त्यामुळे त्यांना मतदारसंघात वेळ नाही. त्यामुळेच त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांनी इस्लामपूर पालिकेची जबाबदारी स्वीकारली आहे. आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी ताकदीने उतरणार आहे. यासाठी प्रतीक पाटील प्रत्येक प्रभागात जाऊन आपला संपर्क वाढवत आहेत. प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी स्वत: प्रयत्न करत आहेत. याला प्रतिसाद मिळत आहे.
चौकट
निष्ठावंतांना न्याय नाही
प्रतीक पाटील प्रत्येक प्रभागात भेट देऊन तेथील समस्या काय आहेत, हे समजावून घेत आहेत. बरेच नागरिक खराब रस्त्यांची तक्रार करतात. त्यांना फक्त आश्वासन दिले जाते. परंतु प्रतीक पाटील यांच्याबरोबर ठराविकच पदाधिकारी असतात. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही.