तासगाव : आगामी काळात देशात आणि राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत, परंतु जरी आघाडी झाली नाही, तरी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसची ताकद आमदार सुमनताई पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील आणि आमदार मोहनराव कदम यांनी अंजनी (ता तासगाव) येथे दिली. आर. आर. पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रतीक पाटील म्हणाले, वसंतदादांच्या पश्चात पक्षीय बंधने बाजूला ठेवून आर. आर. आबांनी आमच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली होती. आबांचा मुलगा रोहित जोपर्यंत राजकारणात येत नाही तोपर्यंत आमदार सुमनताई पाटील यांच्या पाठीशी उभे राहणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे, ती निश्चित पार पाडू.आमदार अनिल बाबर म्हणाले, आबांच्या पश्चात आमदार सुमनताई मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नावर सरकारशी सातत्याने भांडत आहेत. मतदारसंघातील जनतेने त्यांना ताकद द्यावी.
माजी आमदार शरद पाटील म्हणाले की, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्याचा दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी आर. आर. आबांनी राजकीय ताकद पणाला लावली. त्यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमदार सुमनताई पाटील प्रयत्न करत आहेत. त्यांना या संपूर्ण मतदारसंघातील जनतेने साथ द्यावी.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अविनाश पाटील, संजय पाटील, दिनकर पाटील, नामदेवराव करगणे, हणमंतराव देसाई, छायाताई पाटील, नारायण पवार, भानुदास पाटील, सुभाष पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन आबांना आदरांजली अर्पण केली.मोलाची : साथकाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम म्हणाले की, आर. आर. पाटील आणि पतंगराव कदम यांनी राजकीय वाटचालीत एकमेकांना मोलाची साथ दिली आहे. आबांच्या पश्चात आम्ही आमदार सुमनताई पाटील यांच्या पाठीशी उभे राहू.अंजनी (ता. तासगाव) येथे दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या आदरांजली कार्यक्रमात माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शंकरराव पाटील, स्नेहल पाटील, अनिता सगरे, आ. सुमनताई पाटील, आ. मोहनराव कदम उपस्थित होते.