संतोष भिसेसांगली : अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेली पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीच्या प्रतीक्षा रामदास बागडी हिने जिंकली. कल्याणच्या वैष्णवी पाटील हिला अवघ्या २.४१ मिनिटांत लपेट डावात अस्मान दाखवले. हजारो कुस्तीप्रेमीच्या साक्षीने चांदीची गदा मिरवण्याचा मान मिळवला.सांगलीत जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर गुरुवारी व शुक्रवारी (दि. २३ व २४) मॅटवरील स्पर्धा झाल्या. महाराष्ट्रभरातून ४२ संघांच्या ३१० कुस्तीगिरांनी सहभाग नोंदविला. गुरुवारी दिवसभर व शुक्रवारी सकाळी वजनी गटातील आणि उपांत्य फेरीच्या लढती झाल्या. प्रतीक्षा बागडी आणि वैष्णवी पाटील यांनी उपांत्य फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नमवत अंतिम फेरीचा मार्क सुकर केला होता. सायंकाळी ७.२५ वाजता दोघींमध्ये महाराष्ट्र केसरी पदासाठीची अंतिम कुस्ती लावण्यात आली.निळ्या कॉस्च्युममधील प्रतीक्षाने सुरुवातीपासूनच अत्यंत आक्रमक चढाया केल्या. पहिल्या मिनिटांतच लाल कॉस्च्युममधील वैष्णवीला पटात घेऊन चार गुणांची कमाई केली. त्यानंतर वैष्णवीनेही जोरदार प्रतिचढाई केली. पुढील ३० व्या सेकंदांला प्रतीक्षाला जोराने मॅटवर आदळले. एकदम चार गुणांची कमाई केली. तिच्या आक्रमक चढाईला कुस्तीशौकीनांनी चांगलीच दाद दिली.त्यानंतर मात्र प्रतीक्षाने गदालोट घेतला. दुहेरी पट काढत डोळ्याची पापणी लवण्यापूर्वीच वैष्णवीला पाठीवर टाकून तिच्यावर स्वार झाली. दोन गुणांची निर्णायक आघाडी घेतली. ६-४ अशा गुणांनी विजय मिळविला. त्यानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी झाली.प्रतीक्षाच्या विजयानंतर तिच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. तिला खांद्यावरून मिरवतच व्यासपीठावर नेले. जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, कुस्तिगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते चांदीची गदा स्वीकारली.
आजवर इतरांच्या गदा पाहत होते...पहिली महाराष्ट्र केसरी ठरल्यानंतर प्रतीक्षाच्या डोळ्यांतून अखंड अश्रू वाहत होते. तिच्या घामात मिसळून जात होते. सत्कार आणि गदा स्वीकारतानाही एका हाताने ती डोळे पुसत होती. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात हवालदार असलेल्या रामदास बागडी यांची ती मुलगी. लेकीचा कौतुक सोहळा भरल्या डोळ्यांनी आणि अभिमानाने पाहत होते. महाराष्ट्र केसरी झाल्याचा आनंद व्यक्त करताना ती म्हणाली, आजवर इतरांना चांदीची गदा उंचावताना पाहत होते, तशीच गदा उंचावण्याचे माझे स्वप्न आज पूर्ण झाले. घरच्या मैदानावर कुटुंबीयांनी, वस्तादांनी व सहकाऱ्यांनी दिलेला पाठिंबा मोलाचा ठरला. प्रतीक्षा सांगलीच्या वसंतदादा कुस्ती केंद्राची मल्ल आहे.
सांगलीत स्पर्धा, बहुमानही सांगलीलापहिलीच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगलीत झाली आणि सांगलीच्या लेकीने हा बहुमान पटकावला. संपूर्ण लढतीत घरच्या मैदानात समर्थकांचा शेवटपर्यंत पाठिंबा मिळाला. पहिली स्पर्धा लोणीकंद की कोल्हापूर की सांगली, असा वादही रंगला; पण सांगलीकरांनी स्पर्धेचे शिवधनुष्य समर्थपणे पेलले.