सांगली : प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलदगतीने निराकरण होण्यासाठी प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी प्रवासी राजा दिन घेण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. १५ जुलैपासून हा उपक्रम सुरु होणार आहे.या दिवशी एसटीचे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांशी संवाद साधतील. त्यांच्या तक्रारी तातडीने सोडविण्यासाठी उपाययोजना करतील. यातून प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्याचा एसटीचा प्रयत्न आहे. प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये यांना आपल्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरूपात दर सोमवारी व शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी १० ते २ या वेळेत मांडता येतील. त्यावर विभाग नियंत्रक तातडीने कार्यवाही करतील.राज्यभरात एसटी दररोज सुमारे ५४ ते ५५ लाख प्रवाशांची वाहतूक करते. यादरम्यान अनेकदा प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अस्वच्छ स्थानक, गलिच्छ प्रसाधनगृहे, वाहकांची अरेरावी, बंद पडणाऱ्या गाड्या, थांब्यावरील हॉटेलमध्ये महागडी सेवा या सार्वत्रिक तक्रारी आहेत. गाडी वेळेत न सुटणे किंवा एएनवेळी रद्द होणे हा अनुभवही वारंवार येतो. विशेषत: शिवशाहीबद्दल तक्रारी सर्वाधिक आहेत. या सर्व तक्रारी आता थेट विभाग नियंत्रकांसमोर मांडता येतील.
मध्यवर्ती कार्यालय ठेवणार लक्षप्रवासी राजा दिन कोणत्या दिवशी कोणत्या आगारात होईल याचे वेळापत्रक विभाग नियंत्रक वेळोवेळी जाहीर करतील. प्रत्येक लेखी तक्रारीची नोंद ठेवण्यात येणार आहे. त्यावर काय कार्यवाही केली याचीही नोंद ठेवली जाईल. त्यावर थेट मध्यवर्ती कार्यालयाचे लक्ष असेल. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.