लिंगनूर : मिरज पूर्व भागात चक्रीवादळामुळे व मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे खरीप पेरणी व पेरणीपूर्व मशागती कामांना वेग आला आहे. मंगळवारपासून रोहिणी नक्षत्र सुरू झाल्याने धांदल उडाली आहे.
आरग, लिंगनूर, बेळंकी, सलगरे, खटाव भागांत मान्सूनपूर्व पाऊस पडल्याने पूर्वभागात शेतीच्या मशागतीस पूरक वातावरण तयार झाले आहे. शेतकरी आता कृषी दुकानांवर बियाणे व खते खरेदीसाठी येताना दिसत आहेत. मात्र कोरोनामुळे आर्थिक टंचाई निर्माण झाल्याने बी-बियाणे, खते यांची जुळवाजुळव करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत.
रोहिणी नक्षत्रास २५ मेपासून सुरुवात झाली आहे. यामुळे खरिपाच्या पेरणीचे वेध लागले आहेत. आठवड्यापूर्वी आलेल्या पावसामुळे पेरणीपूर्व मशागत करण्यास अनुकूल परिस्थिति निर्माण झाली आहे. बाजारपेठेत निर्बंध आहेत; मात्र शेतीच्या कामासाठी शासनाने मुभा दिल्याने शेती दुकाने सुरू आहेत. मात्र सध्या शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.