इस्लामपूर : अवघ्या ४८ तासांत होत्याचे नव्हते करून सोडल्यानंतर कृष्णा नदीकाठावरील पूरस्थिती निवळत जाऊन ती आता सामान्य होऊ लागली आहे. मात्र, वारणाकाठी पुराची स्थिती अद्याप कायम आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या लांबीच्या बहे पुलावरील पाणी ओसरले असून पुलाची मोठी पडझड झाल्याने तो धोकादायक बनला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पाण्याखाली असणारा कृष्णा नदीवरील बहे पूल रविवारी सकाळी पाण्याच्या प्रवाहातून मोकळा झाला. मनात धडकी भरविणारे अक्राळविक्राळ रूप घेत कृष्णा नदीचे पाणी या परिसरात ठाण मांडून बसले होते. पाण्याचा जोराचा दाब आणि प्रवाहाबरोबर वाहत येणारा कचरा पुलाच्या कठड्यामध्ये अडकला होता. पूल सकाळी खुला झाल्यानंतर हे भयावह चित्र समोर आले. काही ठिकाणी पूल खचला आहे तर बाजूचे संरक्षक कठडे, लोखंडी रेलिंग पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक बनला आहे. सध्या येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पुलावरून कोणालाही जाऊ दिले जात नव्हते. येथे धोका पातळीपेक्षा ५ फूट खाली पातळी गेली होती.
ताकारी पूल अद्याप पाण्याखाली आहे. रात्री ते पहाटेपर्यंत हा पूल पाण्यातून मोकळा होण्याची शक्यता आहे. अद्याप या पुलावर धोका पातळीपेक्षा ९ फूट उंच पाणी आहे. वारणा धरणातील पाण्याचा विसर्ग कमी केला असला तरी वारणा नदीचे पात्र अरुंद असल्याने या काठची पूरपरिस्थिती ओसरण्यास वेळ लागण्याची चिन्हे आहेत. वाळवा तालुक्यात शनिवार आणि रविवार अशा दोन्ही दिवशी पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे.
फोटो : २५ इस्लामपुर ६
ओळ : बहे (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीवरील पुलाचे सुरक्षा कठडे वाहून गेले आहेत.