अशोक पाटील ।इस्लामपूर : विधानसभेसाठी शिराळा मतदारसंघात शिराळा तालुक्यातीलच नेत्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे या मतदारसंघात येत असलेल्या वाळवा तालुक्यातील ४९ गावांतील नेत्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे शिराळ्यातील आमदारकीची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी वाळवा तालुक्यातील नेत्यांत गुफ्तगू सुरू असल्याचे वृत्त आहे.
शिराळा मतदारसंघात २ लाख ८३ हजार ९६५ मतदान आहे. त्यापैकी शिराळा तालुक्यात १ लाख ३६ हजार ९२३ मतदार संख्या आहे, तर वाळवा तालुक्यातील ४९ गावात १ लाख ४७ हजार ४२ मतदार आहेत. मात्र या गावातील मातब्बर नेत्यांना अद्याप आमदार होण्याची संधी मिळालेली नाही. या ४९ गावांत बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता आहे. जिल्हा परिषदेच्या येलूर, पेठ मतदार संघावर महाडिक गटाने वर्चस्व ठेवले आहे.
शिराळा तालुक्यात काँग्रेसच्या ताकदीवर शिवाजीराव देशमुख यांनी मंत्रिपदे मिळवली आहेत. त्यानंतर भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांनाही मंत्रिपद मिळाले. हे दोन गट सक्षमपणे कार्यरत असतानाच राष्ट्रवादीच्या ताकदीवर मानसिंगराव नाईक यांनी आमदारकीचे मैदान मारले. तेव्हापासून शिराळा तालुक्यात तीन गट कार्यरत झाले आहेत. विधानसभेला या तिन्ही गटांचीच मक्तेदारी ठरलेली आहे. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत ही मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी खलबते सुरू झाली आहेत.
वाळवा तालुक्यातील ४९ गावांमधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पी. आर. पाटील, जनार्दन पाटील, रवींद्र बर्डे, डॉ. प्रताप पाटील यांना विधानसभा लढण्याची संधी मिळालेली नाही. यावेळी शिराळ्यातील तिन्ही मातब्बर गटांना शह देण्यासाठी महाडिक युवाशक्तीचे सम्राट महाडिक यांनी ताकद पणाला लावली आहे. यासाठी त्यांनी गेल्या वर्षभरापासून मतदारसंघात युवकांचे संघटन सुरू केले आहे. मात्र ते पुढे सरसावल्यामुळे ४९ गावांतील सर्वच पक्षांतील नेते शिराळकरांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी पुढे येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.