सुशांत घोरपडेम्हैसाळ : नुकताच विधानसभा निवडणुका झाल्या. निकाल लागले. लागलेल्या निकालाच्या आकडेवारीचा अंदाज बांधत मिरज तालुक्यातील दुसऱ्या फळीत कार्यकर्ते म्हणून काम करणारे गावपुढारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे.जिल्हा परिषद निवडणूक ही ग्रामीण भागातील गावासाठी महत्त्वाची ठरते. गावपुढाऱ्यांसाठी ते मिनी मंत्रालय असते. म्हणून सर्व पक्षातील दुसऱ्या फळीत काम करणारे अनेक पुढारी जिल्हा परिषदेसाठी आग्रही असल्याचे दिसून येते. मिरज तालुक्यातून नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार डॉ. सुरेश खाडे यांना ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळाले. भाजपचे अनेक पदाधिकारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारी करत आहेत.विधानसभेचा निकालावरून मिरज तालुक्यातील मतदारांचा कौल लक्षात येतो, असे असले तरी विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या व जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुका वेगळ्या असे राजकीय जाणकारांतून व्यक्त होऊ लागले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक असणाऱ्या काही उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळीच आपल्या जिल्हा परिषद गटाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभेला ग्रामीण भागात प्रचाराची भिस्त सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांना आपले करण्याच्या खेळ्या सर्व पक्षाच्या वरिष्ठांकडून सुरू आहेत. यासाठी सर्व पक्षीय पदाधिकारी कामाला लागले आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादी गटासमोर भाजपचे आव्हानमिरज तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मानणारा मोठा गट आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक व बाजार समितीची निवडणूक यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. विधानसभेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने नेटके नियोजन करत बूथ व्यवस्था हाताळली. यामुळे तानाजी सातपुते यांना ८४ हजार मतदानापर्यंत पोहोचता आले. आता महाविकास आघाडीचे नेते कशी मोठ बांधतात ? हे पाहावे लागेल !पक्षापेक्षा माणूस महत्त्वाचा !जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदार पक्षापेक्षा माणूस बघून मतदान करतो. त्यामुळे निवडणुका मोठी चुरस पहायला मिळते.