अशुतोष कस्तुरेपलूस : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीचे रणांगण तापू लागले आहे. एकमेकांच्या कामाचा पंचनामा सुरू असताना प्रभागनिहाय फिल्डिंग कशी लावायची, याचेही आडाखे नेत्यांकडून आखले जात आहेत.
पलूस पालिकेचे वय कमी आहे. पहिलीच टर्म असल्याने मागील वेळी निवडून आलेल्या नगरसेवकांना स्वतःला गुंतवून घेण्यास काहीसा वेळ लागला. पहिल्या जाहीरनाम्यातील काही कामे सुरू झाली. त्यातील पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेबाबत भरपूर खल करून, अखेर सत्ताधारी काँग्रेसने भूमिपूजन उरकून घेऊन काहीसा दिलासा दिला. निवडणुकीची अद्याप प्रभाग रचना नसली तरी, नेतेमंडळी निवडणुकीच्यादृष्टीने कामाला लागली आहेत. सत्ताधारी काँग्रेसला शह देण्यासाठी इतर सर्व पक्ष एकत्र येतात, की महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
डॉ. पतंगराव कदम यांच्या मंत्रिकाळात सुरू झालेली औद्योगिक वसाहत, बाजार समिती यामुळे शहराच्या विकासात भर पडली आहे. कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी कोट्यवधींचा निधी पलूसला दिल्याने या कामाच्या जोरावर सत्ताधारी काँग्रेस मतदारांसमोर जाणार आहे.
बापूसाहेब येसुगडे यांनी संग्राम उद्योग समूहाच्या माध्यमातून शहरातील लहानात लहान घटकाला न्याय दिला. त्यांचे पुत्र नीलेश येसुगडे स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत जात आहेत.
कडेगाव नगरपालिकेच्या विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांत यावेळी उत्साह असून, सत्ता काबीज करण्यासाठी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी चाचपणी सुरू केली आहे.
गतवेळी राष्ट्रवादीला शहरात म्हणावे तेवढे यश मिळाले नव्हते. आता आमदार अरुण लाड यांच्या आमदारकीनंतर विकास कामांना प्राधान्य देऊन, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड राष्ट्रवादीची धुरा सांभाळत आहेत. मनसे, शिवसेना, आरपीआय आणि इतर पक्षही नशीब अजमावण्यासाठी तयारीला लागले आहेत.
नॅशनल गोल्ड सिल्व्हर रिफायनरीचे उपाध्यक्ष गणपतराव पुदाले यांनी सोनाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याच्या जोरावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे.
समीकरणे लवकरच उलगडणार
प्रभाग रचना कशी असेल? आघाडी कोणाची होणार? स्थानिक नेत्यांची जुनी दुखणी या निवडणुकीत कशी निघणार? कोणी किती विकास केला? हे सगळे येत्या काही दिवसात या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.