दत्ता पाटीलतासगाव : तासगावच्या रथोत्सवात राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील, भाजपचे युवा नेते प्रभाकर पाटील दर्शनासाठी आले होते. या वेळी त्यांच्या समर्थकांनी भावी आमदार म्हणून सोशल मीडियावर जयघोष केला. अलीकडे प्रत्येक ठिकाणी दोन्ही युवा नेत्यांचा भावी आमदार म्हणूनच उल्लेख केला जातो. त्यामुळे ‘भावी आमदार दोन, नेमकं होणार कोण?’ असाच प्रश्न जनतेला पडला आहे.
तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात आर. आर. पाटील आणि संजयकाका गटात नेहमीच संघर्ष राहिला. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर हा संघर्ष काहीसा कमी झाला आहे. अलीकडच्या काळात तर दोन्ही गटाच्या नेत्यांकडून समोरासमोर कोणतेच राजकीय हेवेदावे झाले नाहीत. त्यामुळे लोकसभेला संजयकाका आणि विधानसभेला सुमनताई हे समीकरण गृहीत धरूनच कारभार सुरू आहे.
तालुक्यातील राजकारणातील एकमेकांचे विरोधक निष्प्रभ ठरलेले आहेत. दुसरीकडे येणाऱ्या विधानसभेला मात्र राजकीय समीकरणाचे फासे कसे पडणार याचे कुतूहल सध्याच्या राजकीय घडामोडीतून दिसून येत आहे. आर. आर. पाटील यांच्या पश्चात त्यांचे पुत्र राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील सक्रिय झाले आहेत. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत स्वतः रोहित पाटील रिंगणात असणार यात तिळमात्र शंका नाही. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनीही यावर शिक्कामोर्तब केले आहे. निवडणुकीला बराच कालावधी असला तरी रोहित पाटील यांच्या समर्थकांनी त्यांचा भावी आमदार असा उल्लेख करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियासह बहुतांश ठिकाणी भावी आमदार रोहित पाटील असाच उल्लेख होताना दिसताे.
दुसरीकडे भाजप समर्थकांकडूनही खासदार संजयकाका यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांचा उल्लेख भावी आमदार असाच होताना दिसत आहे. संजयकाकांनी आपल्या मुलाच्या उमेदवारीबाबत अद्याप कोणतेही सुतोवाच केलेले नाही. प्रभाकर पाटील यांनीही याबाबत उघडपणे कोणतीही वाच्यता केलेली नाही. मात्र खासदार समर्थकांनी आत्तापासूनच प्रभाकर पाटील यांचे भावी आमदार म्हणून ब्रॅण्डिंग सुरू केले आहे.तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून रोहित पाटलांच्या विरोधात कोण?भाजप आणि राष्ट्रवादीकडून दोन्ही युवा नेत्यांचे भावी आमदार म्हणून ब्रॅण्डिंग सुरू आहे. रोहित यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी प्रभाकर यांच्या उमेदवारीवर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत रोहित पाटील यांच्या विरोधात कोण? हे अद्याप स्पष्ट नाही. तरीही सद्यस्थितीत तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात ‘भावी आमदार दोन.. नेमकं होणार कोण?’ असाच प्रश्न मतदारांना पडला आहे.