अशोक पाटीलइस्लामपूर : गेल्या साडेचार वर्षांतील शहरातील विकासकामांबाबत बहुतांश माजी नगरसेवकांमधून नाराजीचा सूर आहे. सत्ताधारी विकास आघाडी आणि विरोधातील राष्ट्रवादीची कारकीर्द सर्वसामान्यांच्या हिताची ठरली नाही, असे मत व्यक्त करत माजी नगरसेवक एल. एन. शहा आणि कपिल ओसवाल यांच्यासह अनेकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.सत्ताधारी विकास आघाडी आणि विरोधी राष्ट्रवादीची पालिका सभागृहातील कारकीर्द उल्लेखनीय नसल्याचे शहा आणि ओसवाल सांगतात. आंबेडकर पुतळा सुशोभिकरण वगळता उर्वरित विकासकामांवर चर्चेव्यतिरिक्त काहीच झाले नाही. त्यामुळे पालिकेच्या राजकारणातील जुने चेहरे पुन्हा पालिकेत येण्याची तयारी करत आहेत. शहा यांची कारकीर्द नेहमीच चर्चेची ठरली आहे. मागील निवडणुकीत त्यांनी विकास आघाडीसाठी माघार घेतली होती. वैभव पवार यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी मदत केली. १९९६ मध्ये त्यांच्या पत्नी लताबाई रायगांधी पालिकेच्या सभागृहात होत्या.त्यानंतर २००१ मध्ये एल. एन. शहा पालिकेत गेले. २००६ च्या निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. २०११ ला राष्ट्रवादीच्या चिमण डांगे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी राजकीय संन्यास घेतल्याचे चित्र हाेते; पण आता ते पुन्हा तयारीला लागले आहेत.कपिल ओसवाल यंदा स्वत: मैदानात उतरणारनगरपालिकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत महाडिक गटाच्या कपिल ओसवाल यांनी बंधू अमित यांना उभे केले. आता त्यांनी स्वत: उतरण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीतील एल. एन. शहा, कपिल ओसवाल, अमित ओसवाल यांच्या उमेदवारीबाबत व्यापारीवर्गात चर्चेला उधाण आले आहे.
इस्लामपूर पालिकेच्या राजकारणात पुन्हा येणार जुने चेहरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 1:07 PM