कडेगाव (सांगली) : हिंदु- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडेगाव येथील मोहरमनिमित्त शनिवारी, २९ जुलै रोजी गगनचुंबी ताबूत भेटी होणार आहेत. या सोहळ्याची तयारी शहरात सुरू झाली आहे. ताबूत उभारणी वेगात सुरू आहे.कडेगावकरांनी मोहरमच्या निमित्ताने हिंदू-मुस्लीम ऐक्य घडवून जनतेसमोर आदर्श निर्माण केला आहे. ही परंपरा मागील १५० वर्षांपासून सुरू आहे. यामुळे गगनचुंबी ताबुतांचा उत्सव साजरा करणारे कडेगाव देशभरात प्रसिद्ध आहे. येथील मोहरम ब्राम्हण समाजातील संस्थानिक श्रीमंत भाऊसाहेब देशपांडे यांनी सुरू केला. मोहरमनिमित्त काव्यरचना करीत हिंदू-मुस्लिम ऐक्य घडवण्याचे काम थोर संत सय्यदपीर साहेब हुसेन पिरजादे यांनी केले. १८८५ पासून येथे उंच ताबूत बसवण्यात येतात. बकरी ईदनंतर ताबुतांच्या बांधणीला सुरुवात झाली आहे. प्रतिपदेचा चंद्र पाहून कुदळ मारली जाते. हिंदू-मुस्लीम बांधव खांद्याला खांदा लावून ताबुतांची बांधणी करतात.
आधी कळस मग पाया
ताबुतांची बांधणी वैशिष्टपूर्ण असते. आधी कळस मग पाया यानुसार त्यांची बांधणी केली जाते. चौदा ताबूत बसविले जातात. त्यापैकी निम्मे हिंदूचे असतात. ताबुतांची उंची सुमारे ११० ते १३५ फुटापर्यंत असते. कळकाच्या (बांबूच्या), चिकन मातीच्या सहाय्याने सुतातून उभारणी केली जाते. ताबूत बांधताना कोठेही गाठ दिली जात नाही, हे याचे खास वैशिष्ट्य मानले जाते. संपूर्ण ताबुतांचे अष्टकोनी मजले तयार केले जातात. वास्तूशास्त्राच्या आधारावर ते होतात. उभारणी झाल्यावर त्यावर रंगीत, आकर्षक कागद लावले जातात. विद्युत रोषणाई केली जाते.सर्वधर्मीय युवकांचे योगदान सध्या ताबूत बांधकामानिमित्त रात्री जागू लागल्या आहेत. ताबूत उभारणीस गती प्राप्त झाली आहे. यामध्ये सर्वधर्मीय युवकांचे मोठे योगदान दिसून येते.