सांगली : सांगलीत ४ ते १४ जानेवारी दरम्यान नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.४ जानेवारीला सकाळी ध्वजारोहणापासून सोहळ्यास प्रारंभ होईल. रामभाऊ आणि विश्वास गवळी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण होणार आहे. यावेळी गुरुनाथ कोटणीस महाराज, दीपक केळकर महाराज, बजरंग झेंडे महाराज, आचार्य तुषार भोसले, शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्यात केज (जि. बीड) येथील समाधान महाराज शर्मा मराठीतून श्रीराम कथा सांगणार आहेत. ५ ते १३ जानेवारीअखेर श्रीराम कथा सादर होणार आहे. ५ जानेवारीला सकाळी साडेआठ वाजता अनेक संत सद्गुरू भाविक यांच्या उपस्थितीत राम मंदिर चौकातून कलश शोभायात्रा काढण्यात येणार आहे.शुक्रवार, ६ रोजी श्रीराम जन्मोत्सव, रविवार ८ रोजी श्रीराम विवाह सोहळा, शुक्रवार १३ रोजी श्रीराम राज्याभिषेक आणि शनिवार १४ रोजी महादिंडी सांगता समारोह होणार आहेत. या सोहळ्यात आरोग्य सेवाही केली जाणार आहे. यामध्ये सर्व रोग निदान शिबिर, महारक्तदान शिबिर, नेत्र तसेच दंत तपासणी शिबिर, बालरोग तपासणी शिबिर होणार आहे.महोत्सव स्थळाचे अयोध्यानगरी असे नामकरण करण्यात आले असून मंडप उभारणी पूर्ण झाली आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे संयोजक मनोहर सारडा यांनी सांगितले. हा सोहळा यशस्वी होण्यासाठी नगरसेवक लक्ष्मण नवलाई, राहुल ढोपे-पाटील, आर. बी. पाटील, शंकरराव पोतदार, हनुमान तोष्णीवाल, राहुल नवले, हार्दिक सारडा, प्रकाश शहा, ओमप्रकाश झंवर परिश्रम घेत आहेत.
श्रीरामकथा नामसंकीर्तन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात, सांगलीत उद्यापासून सोहळ्यास प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 3:38 PM